PuneRains : सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर; रस्त्यांवर पाणीच पाणी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 September 2019

पुण्यात जोरदार पाऊस झाला असून विविध भागात पाणीच पाणी साचले आहे. रस्त्यांवरुनही पाणी वाहत आहे.

पुणे ः पुन्हा धुवाधार... रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे वेगाने वाहणारे लोट... वाहतूक कोंडी. सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी रात्री पुणेकरांना पावसाचा सामना करावा लागला.

Image may contain: sky, house and outdoor

शहरात दिवसभर पावसाळी वातावरण होते. हवामान खात्याने संध्याकाळनंतर पाऊस पडेल, असा अंदाजही वर्तविला होता. त्यामुळे रेनकोड, जर्किन, छत्री अशा पूर्ण तयारीसह पुणेकर घराबाहेर पडले होते.

हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे सायंकाळी सातनंतर पावसाच्या हलक्‍या सरींना सुरवात झाली. रात्री नऊपर्यंत 0.2 मिलमीटर पावसाची नोंद शिवाजीनगर येथील वेधशाळेत झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा मंगळवारी रात्रीप्रमाणेच धुवाधार पाऊस सुरू झाला. पुणेकरांनी पावसाचा सामना करण्याची तयारी केली होती. मात्र, तरीही रस्त्यावरून वाहू लागलेले पाण्याचे लोंढे आणि त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी याचा मनः स्ताप सहन करावा लागला.

शास्त्री रस्ता, सिंहगड रस्ता, नांदेड येथील गोसावी वस्ती रस्ता, स्वारगेट, सारसबागचा परिसर, गणेशखिंड रस्ता, सातारा रस्ता, शंकर महाराज रस्त्यावर कात्रजकडे जाणारा लेन या सर्वठिकाणी पाण्याचे लोट जोराने वाहत होते. वडगाव शेरी, विमाननगर, खराडी, चंदननगर, नगर रस्ता येथे पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावर पाणी आले होते.

Image may contain: night, outdoor and water

वारजे येथील वनखात्याच्या सीमाभिंतीला भडदाड पडल्याने टेकडीवरून येणारे पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहू लागले होते. खडकवासला येथील कोल्हेवाडीतील सोसायट्यांमध्ये पाणी शिरले.

शहरातील विविध भागातील अपडेटस-
खडकी बाजार : खडकी, बोपोडी, मुळा रोड ,वाकडेवाडी रेंजहिल परिसरात ८.३० वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे,राजभवन ते मुळा रोड येथे साडेसातपासून खडकी बाजार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर बोपोडी सिग्नल पर्यंत वाहतूक सुमारे तासभर अडकून पडली.

कात्रज - धनकवडी- येथील शंकर महाराज उड्डाणपूलाखाली बीआरटी मार्गीका आणि नागरी मार्गातून गुडगाभर उंचीचा पाण्याचा प्रवाह अहिल्यादेवी चौकाच्या दिशेने वाहत आहे. त्याचवेळी उंचावरील संभाजीनगरच्या मुख्य रस्त्यावरून  येणारा पाण्याचा लोंढा के के मार्केटच्या दिशेने अंबील ओढ्याकडे वाहताना ओढ्याचे स्वरूप आले आहे. मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

सिंहगड रस्ता- सिंहगड रस्ता परिसरात मुसळधार पाऊस सुरू माणिकबागनगर, तुकाईनगर, समर्थ नगर, महादेव नगर, हिंगणे विठ्ठलवाडी राजाराम, पूल जुना जकात नाका परिसर, पू. ल. देशपांडे उद्यान, दत्तवाडी, दांडेकर पुल परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागत पाणी साचले असून नागरिकांची धावपळ होत आहे.

खडकवासला : ओढ्याचे पाणी 20- 25 घरात घुसले. ओढ्यालगत घोट्यात पाणी गेल्याने दोन म्हशी बुडून मेल्या, दुचाकी, मोटारी वाहून गेल्या असून पानशेत रस्त्यावर ग्रामपंचायत चौक ते जिल्हा बँक येथे रस्त्यावर पाणी साचले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने पुण्याकडे येणारा रस्ता बंद आहे.

कर्वे रस्ता - कर्वे रस्त्यावरील कर्वे पुतळा चौकात खूप पाणी साचले आहे.

दांडेकर पूल- दांडेकर पूल झोपडपट्टीमध्ये आंबील ओढ्यातून आलेले पाणी शिरले आहे. पोलिस पाण्यात उतरून लोकांना घरातून सुरक्षीत बाहेर काढत आहेत.

बावधान - भूगाव : बावधान - भूगावमध्ये पावसाने रस्त्याची दैना झाली असून भूगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे.

शिवाजीनगर, पुणे स्टेशन, रास्ता पेठ ,भवानी नाना पेठ टिम्बर मार्केट सेवन लव्हज चौक या भागात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे रस्त ओसाड पडले आहेत रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू आहे.​

वाहतूक व्यवस्था कोलमडली
रिक्षेसह ओला, उबेर या ऍपवरून कॅबच्या मागणीत प्रचंड वाढ वाढली. त्यामुळे या सेवांचे भाडेही अव्वाच्या सव्वा वाढले. त्यातही चालक जवळचे अंतर घेण्यास नकार देत होते. रिक्षा किंवा कॅब मिळत नव्हत्या. त्यामुळे रात्री नऊ वाजल्यानंतर घरी जाणाऱ्यांचे मोठे हाल झाले.

खवय्यांनाही फटका
पावसाचा फटका शहरातील खवय्यांनाही बसला. वेगवेगळ्या ऍपवरून खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या सेवेलाही पावसाचा फटका बसला. अनेक कंपन्यांना ही सेवा घरपोच देणे शक्‍य होत नसल्याचे सांगत "ऑर्डर' रद्द केल्या. तसेच, विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस याचा फटका "डीटूएच'सेवेलाही बसला. शहराच्या अनेक भागातील ही मनोरंजनाची सेवा ठप्प पडली. तर, वेगवेगळ्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in pune consecutive third day