लोणावळ्यात पावसाचा धुव्वा; भुशी धरणावर जाण्यास मनाई

भाऊ म्हाळसकर
शनिवार, 27 जुलै 2019

पर्यटकांसाठी भुशी धरणावर मनाई
भुशी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरुन जवळपास अडीच ते तीन फुट पाणी वाहत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लोणावळा पोलिसांनी भुशी धऱणाच्या सांडव्यावर जाण्यास शनिवारी पर्यटकांना मनाई कऱण्यात आली आहे. लोणावळा ते आयएनएस शिवाजी मार्गावर मोतीराम हाॅटेलसमोर नाला तुंबल्याने रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद झाली होती.

लोणावळा : लोणावळा, खंडाळा परिसरास पावसाची धुवाधार बॅटीग सुरुच असून, गेल्या २४ तासात तब्बल ३७५ (१४.७६ इंच) पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसामुळे लोणावळेकरांची दाणादाण उडाली असून लोणावळेकर घराबाहेर पडेनासे झाले आहेत. राज्यभरात सर्वदूर पावसाची संततधार सुरुच असल्याने नागरिकांनी घरात राहणे पसंत केले आहे. त्यामुळे विकेंडला पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्य़टकांची संख्याही रोडावली असून लोणावळा-खंडाळ्यात पर्य़टकांची संख्या तुरळक आहे. 

पर्यटकांसाठी भुशी धरणावर मनाई
भुशी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरुन जवळपास अडीच ते तीन फुट पाणी वाहत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लोणावळा पोलिसांनी भुशी धऱणाच्या सांडव्यावर जाण्यास शनिवारी पर्यटकांना मनाई कऱण्यात आली आहे. लोणावळा ते आयएनएस शिवाजी मार्गावर मोतीराम हाॅटेलसमोर नाला तुंबल्याने रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुक बंद झाली होती. त्यामुळे भुशीकडे जाताना सावधगिरी बाळगण्याच्या सुचना पोलिसांनी दिल्या. परिसरातील ओढे-नाले, धबधब्यांना प्रचंड पाणी आले असून इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

नांगरगाव येथील जाधव काॅलनी, विघ्नहर सोसायटीस पाण्याचा वेढा
जोरदार पावसामुळे नाले तुंबल्याने  नांगरगाव येथील जाधव काॅलनी, विघ्नहर सोसायटीस पाण्याने वेढा दिल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. याचबरोबर तुंगार्ली, ब्रदीविशाल सोसायटी, वळवण येथील एक्स्प्रेस वेच्या पुलाखाली, निसर्गनगरीतही दीड ते दोन फुट पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

कार्ला फाटा ते वेहरगाव रस्ता पाण्याखाली
लोणावळ्यासह कार्ला,कुसगाव, औंढे-औंढोली ग्रामिण भागासही पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. दरम्यान कार्ला फाटा ते वेहेरगाव एकविरा देवी मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन ते तीन फुट पाणी साचल्याने वाहतुक बंद झाली. लोणावळा ते पवनानगर रस्त्यावर कुसगाव वाडी येथील पुलाजवळ पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गुरववस्ती, भैरवनाथ नगर, डोंगरगाव वाडी येथील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. सदापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलास पाणी लागल्याने वाहनचालकांची त्रेधा उडाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in Lonavala area tourist not going to Bhushi dam