पावसाचा रुद्रावतार, शिरसाई मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच पाणी 

संतोष आटोळे
Monday, 7 September 2020

बारामती तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील शिर्सुफळसह परिसरातील गावांमध्ये रविवारी पावसाने चांगलेच झोडपले. यामध्ये कुठे रस्ते वाहून गेले, कुणाच्या घरात पाणी शिरले, तर मोठ्या प्रमाणावर पिकांचेही नुकसान झाले आहे.

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील शिर्सुफळसह परिसरातील गावांमध्ये रविवारी पावसाने चांगलेच झोडपले. यामध्ये कुठे रस्ते वाहून गेले, कुणाच्या घरात पाणी शिरले, तर मोठ्या प्रमाणावर पिकांचेही नुकसान झाले आहे. शिर्सुफळ येथील हेमांडपंती शिरसाई मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच ओढ्याचे पाणी पोहचले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिर्सुफळसह पारवडी, साबळेवाडी, गाडीखेल, कटफळ, सिद्धेश्वर निंबोडी, वंजारवाडी, जैनकवाडी या भागामध्ये रविवारी रात्री झालेल्या पावसाने या गावात पूरस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने रात्रभर लोकांचे हाल झाले. तर, शिर्सुफळ येथील बारामती तालुका दूध संघाच्या दूध संकलन केंद्रामध्ये पाणी शिरले. तसेच, गावातून आटोळे वस्तीकडे जाणारा रस्त्यावरील पूल वाहून गेला. त्यामुळे या भागातील वाहतूक बंद पडली. शिर्सुफळ येथील हेमांडपंती शिरसाई मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच ओढ्याचे पाणी पोहचले. 

मतदारांनो, तुम्ही जे पेरलंय, तेच उगवलंय

यंदा समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, भूईमूग, मूग, मका व इतर चारा पिके व भाजी पिके घेतली आहेत. तसेच, उसाचे पीकही जोरदार होते. बाजरीची पिके अंतिम टप्प्यात आली आहे. बहुतांशी शेतकऱ्यांची बाजरीची काढणी व खुडणी सुरू आहे. रविवारी रात्री अचानक आठच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. विजांच्या कडकडाटसह सुमारे दोन तास मुसळधार पाऊस पडला. अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेल्या बाजरीच्या पिकांचे प्रंचड नुकसान झाले आहे. अनेकांचा ऊस जमीनदोस्त झाला. ओढ्याला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणचा रस्ता खचला व काही ठिकाणचे पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पंचनामा करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Baramati taluka, severe damage to agriculture