कोकण, मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार; पुढील चार दिवस पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या बुधवारी (ता. २३) ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे मंगळवारी वर्तविण्यात आला.

पुणे : मतदानाच्या दिवशी हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजाला पावसाने दिवसा हुलकावणी दिली, मात्र रात्री धो-धो पडला. या पार्श्‍वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी (ता. २४) पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काल रात्री राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात  आज (बुधवारी) ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे मंगळवारी वर्तविण्यात आला. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात हा पाऊस पडत आहे. पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचेही खात्याने स्पष्ट केले आहे. 

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात वादळी पाऊस पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात सोमवारी बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. आकाश अंशतः ढगाळ होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा पुन्हा वाढला. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होत असल्याने या भागात पावसाने जोर धरला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असतानाच, बंगालच्या उपसागरात मंगळवारी नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या दोन्ही प्रणाली पूरक ठरून दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. 

कोकणात गुरुवारी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस पुढील चार दिवस राहणार आहे. कोकण किनाऱ्यालगत वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains warning in Konkan, Central Maharashtra