भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेने हायमास्ट खांब रस्त्यावर लोंबकळला

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 17 मार्च 2018

दौंड : दौंड शहरातील रोटरी सर्कल येथे भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने नगरपालिकेचा हायमास्ट खांब रस्त्यावरच लोंबकळल्याने व या ट्रकला पाठीमागून येणारा ट्रक धडकल्याने दोन्ही ट्रकचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

दौंड : दौंड शहरातील रोटरी सर्कल येथे भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने नगरपालिकेचा हायमास्ट खांब रस्त्यावरच लोंबकळल्याने व या ट्रकला पाठीमागून येणारा ट्रक धडकल्याने दोन्ही ट्रकचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

दौंड शहरातून नगर - दौंड - बारामती हा राष्ट्रीय महामार्ग जात असून रेल्वे उड्डाण पूल - गजानन सोसायटी - रोटरी  सर्कल मार्गे हा रस्ता कुरकुंभच्या दिशेने जातो. तसेच बारामती व कुरकुंभ कडून येणारी वाहने सर्कलला अर्धवळसा घालून दौंड शहराकडे जातात. रेल्वे उड्डाण पुलाकडून येणारी वाहने रोटरी सर्कलला वळसा घालून कुरकुंभच्या दिशेने जाणे अपेक्षित आहेत परंतु अरूंद रस्ता आणि अतिक्रमणांमुळे वाहनचालक उतार असल्याने वळसा न घालता जागेवर वळत असल्याने येथे सदैव अपघात होतात.

आज (ता. १७) पहाटे रेल्वे उड्डाण पुलाकडून रोटरी सर्कल मार्गे कुरकुंभच्या दिशेने जाणारे दोन मालवाहतूक करणारे ट्रक एका पाठीमागे चालले होते. रोटरी सर्कलच्या उतारावर त्यापैकी एका ट्रकने भरधाव वेगात पुढील ट्रकला धडक दिल्याने दोन्ही ट्रकचे नुकसान झाले व पुढचा ट्रक (क्रमांक उपलब्ध नाही) निघून गेला. मात्र मागचा ट्रक (क्रमांक एम. एच. ०४, ई. एल. ५४९९) सर्कलजवळील नगरपालिकेच्या हायमास्ट खांबाला धडकून थांबल्याने सदर खांब रस्त्यावर लोंबकळला. हायमास्टचा खांब कोसळला तरी दिवे सुरू होते आणि नंतर विद्युतप्रवाह खंडित केल्याने पुढील अनर्थ टळले.   

रोटरी सर्कलच्या पुढे राज्य राखीव पोलिस दलाची शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू असल्याने राज्यभरातील अनेक उमेदवार शहरात मुक्कामी असून त्यांची पहाटेपासून या रस्त्यावर ये - जा सुरू आहे. कुरकुंभ व बारामती कडे जाण्यासाठी याच अरूंद रस्त्यावर बस थांबा आहे. सुदैवाने अपघात झाला तेव्हा फार वर्दळ नसल्याने जीवितहानी झाली नाही.

सदर खांब रस्त्यावर दुपारपर्यंत लोंबकळलेल्या अवस्थेत राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्गावर एका पाठीमागे सलग पाच ते सहा ट्रक परस्परांमध्ये फक्त ४ ते ५ फूट अंतर सोडून मार्गक्रमण करीत असल्याने अन्य वाहनचालकांची कोंडी होते आणि दुचाकीस्वारांचे प्रचंड हाल होतात. अशा प्रकारे सलग जाणार्या वाहनांवर महामार्ग पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. 

रूंदीकरण व पादचारी मार्गाची गरज
पश्चिम महाराष्ट्रातून दौंड मार्गे उत्तर व मध्य महाराष्ट्राकडे जाण्यासाठी या महामार्गाचा वापर प्रामुख्याने होतो. नगर - दौंड - बारामती या राष्ट्रीय महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळकडून केले जात असून काँक्रिटीकरण करण्यापूर्वी रेल्वे उड्डाण पूल - गजानन सोसायटी - रोटरी  सर्कल - राज्य राखीव पोलिस दल गट पाच मुख्यालय दरम्यानच्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासह पादचारी मार्गाची नितांत गरज आहे. 

Web Title: A heavy truck hit the highway on the pole