ऋणानुबंधांच्या गाठींवर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

शंकर टेमघरे
मंगळवार, 28 मार्च 2017

आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेचा शतकपूर्ती सोहळा; अध्यापकांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांप्रती आदरभाव

आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेचा शतकपूर्ती सोहळा; अध्यापकांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांप्रती आदरभाव
आळंदी - विद्यार्थ्यांना शुल्क नाही आणि शिक्षकांना पगार नाही, अशी आळंदीतील (ता. खेड, जि. पुणे) सद्‌गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था तब्बल शंभर वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. तसेच, येथील हजारो वारकरी विद्यार्थ्यांना ताजे अन्न अर्थात माधुकरी देण्याची परंपरा टिकवून ठेवणारे अन्नदातेही आळंदी पंचक्रोशीत आहेत. त्यांच्याप्रतीचा आदरभाव आणि संस्थेचा शतकपूर्ती सोहळा यानिमित्त मंगळवारी (ता. 28) संस्थेसह पंचक्रोशीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि वारकरी साधक यांच्यातील ऋणानुबंधांचा भावनिक धागा अधिक बळकट होणार आहे.

संस्थेची मुहूर्तमेढ
संत वाङ्‌मयाचा अभ्यास साधकांना करता यावा, या भावनेने 1917 मध्ये सद्‌गुरू विष्णुबोवा जोग यांनी आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. बंकटस्वामी महाराज, लक्ष्मणबोवा इगतपुरी, मारुतीबोवा गुरव, मामासाहेब दांडेकर यांनी संस्थेची रचना केली. त्यानंतर विठ्ठलमहाराज चौधरी, नथुसिंगबोवा राजपूत, विठ्ठलबोवा घुले, मधुकरबोवा शिंपी, पांडुरंगबोवा वैद्य, रामचंद्रबोवा निकम यांनी संस्थेचा लौकिक आणखी वाढविला.

विनाशुल्क अध्ययन अन्‌ अध्यापन
वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारत नाही. तसेच अध्यापकही पगार घेत नाहीत. अशा स्थितीत आजही संस्था अतिशय दिमाखात सुरू आहे. सध्या शांतिब्रह्म मारोतीमहाराज कुरेकर, माणिकशास्त्री मुखेकर, बाजीरावनाना चंदिले, भास्करबोवा शिंदे, ज्ञानेश्वरमाउली शिंदे, उल्हासबोवा सूर्यवंशी, ज्ञानेश्वरमाऊली कदम हे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

विद्यार्थ्यांचा पेहराव
वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला धोतर, पांढरा शुभ्र सदरा, टोपी, डोक्‍यावरील केसांचे मुंडण अशी वेशभूषा आवश्‍यक आहे. संत, महात्म्यांच्या सात्त्विक विचारांचे अनुकरण करणे, हा येथील शिक्षणाचा मूलभूत निकष मानला जातो.

संत वाङ्‌मयाचा अभ्यास
वारकरी शिक्षणाच्या चार वर्षांच्या अभ्यासक्रमात ज्ञानेश्‍वरी, पंचदशी, विचारसागर, गीत, संस्कृत व मराठी व्याकरण, कीर्तन, प्रवचन, भजनाचे धडे दिले जातात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी कीर्तनातून संतविचारांचा प्रचार व प्रसार करतात.

जिवाला आवडी कीर्तनाची गोडी
वारकरी संस्थेचा शतकपूर्ती सोहळा आळंदीत सुरू आहे. त्यानिमित्त आजी-माजी विद्यार्थ्यांची मांदियाळी जमली आहे. हजारो भाविक ज्ञानेश्‍वरी पारायण करीत आहेत. नामवंतांच्या कीर्तनाची गोडी भाविक चाखत आहेत. श्रवण सुखाचा आनंद घेत आहेत. संस्थेचे माजी विद्यार्थी ज्येष्ठ कीर्तनकार रामरावमहाराज ढोक हे रामकथा सांगत आहेत. अनेक साधू, महंत, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी सोहळ्याला भेट दिली आहे.

नेटके नियोजन हेचि वैशिष्ट्य
शांतिब्रह्म मारोतीमहाराज कुरेकर यांच्या नेतृत्वाखाली नेटके नियोजन हेच महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे. महोत्सवाचा मुख्य दिवस गुढीपाडवा (ता. 28) असून त्यानिमित्त संस्थेचा परिसर, संत ज्ञानेश्‍वरमहाराज मंदिर, देहूतील संत तुकाराममहाराज मंदिर, भंडारा डोंगर, जोग महाराज मंदिर, यांसह आळंदी पंचक्रोशीतील वीस किलोमीटर परिसरातील गावांवर सकाळी दहा वाजता पुष्पवृष्टी केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संदीपानमहाराज शिंदे आणि विश्‍वस्त भालचंद्र नलावडे यांनी सांगितले.

मांडे अन्‌ आमरसाचा महाप्रसाद
संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पाठीवर संत मुक्ताईने मांडे भाजले होते. त्याचे स्मरण म्हणून शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभाला बुधवारी (ता. 29) दुपारी महाप्रसादाला खानदेशातील (जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हे व नाशिक जिल्ह्यातील काही भाग) गावांमधून दोन ट्रक मांडे आणि एक लाख लोकांना पुरेल इतका आंबरस पाठविण्यात येणार आहे. वारकरी विद्यार्थ्यांना माधुकरी देणाऱ्यांना ग्रामस्थांनाही संस्थेने निमंत्रित केले आहे.

Web Title: helicopter flower show in alandi