होते हेल्मेट म्हणून...!

पांडुरंग सरोदे
रविवार, 2 डिसेंबर 2018

अपघातामध्ये दुचाकीस्वार किंवा पाठीमागील व्यक्तीच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. हेल्मेट वापरल्यास डोक्‍याला होणारी दुखापत टळून अनेकांचे प्राणही वाचतील. 
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय 

पुणे : आठ दिवसांपूर्वीची घटना... आरटीओ चौकामध्ये सिग्नल लागल्यामुळे नायडू हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या चैताली होले या युवतीने तिची दुचाकी थांबवली... तेवढ्यात पाठीमागून आलेल्या मोटारीची तिला धडक बसल्याने ती रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली... मात्र तिच्या डोक्‍यावर हेल्मेट होते म्हणून तिचा जीव वाचला.... शहरात दरवर्षी दुचाकींचे शेकडो अपघात होतात. त्यात हेल्मेट परिधान न केल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. यामुळे हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन होणे गरजेचे आहे. 

पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी 1 जानेवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयास नागरिकांसह राजकीय व्यक्तीनींही विरोध दर्शवला आहे. हे करत असताना शहरातील दुचाकींचे अपघात, त्यामध्ये मृत्युमुखी पडणारे, जखमी होणारे नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर अशी वेळ का आली, याचा मात्र गांभीर्याने विचार होत नसल्याची सद्यःस्थिती आहे. 

कधी दुचाकी घसरून, तर कधी भरधाव वाहनाची ठोकर बसून अपघात होतात. या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांना त्याची किंमत मोजावी लागते. बहुतांश अपघातांमध्ये डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आहेत. 2017 मध्ये 212 दुचाकीस्वार व सहप्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 405 जण जखमी झाले आहेत. 2018 च्या ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत 171 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 267 जण जखमी झाल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते. बहुतांश अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर केला नसल्याचेही एक प्रमुख कारण पुढे आले आहे. 
--------------------- 
2017 मधील दुचाकी अपघातांची स्थिती 
मृत दुचाकीस्वार ः 176 
मृत सहप्रवासी ः 36 
जखमी दुचाकीस्वार ः 306 
जखमी सहप्रवासी ः 99 
-------------------------- 
2018 मधील दुचाकी अपघातांची स्थिती 
मृत दुचाकीस्वार ः 136 
मृत सहप्रवासी ः 35 
जखमी दुचाकीस्वार ः 205 
जखमी सहप्रवासी ः 62 

हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दुचाकींच्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव जातो. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करावे, त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघनही होणार नाही आणि अनेकांचा जीवही वाचेल. 

- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा 

माझा 18 वर्षांचा मुलगा मंदार परीक्षेला जाताना त्याला ट्रकचा धक्का बसला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याने हेल्मेट वापरले असते, तर कदाचित आमच्या वाट्याला दुःख आले नसते. 

- विजय भोई 

महापालिकेने केलेल्या खड्ड्यामुळे माझे पती रशीद इराणी यांचा दुचाकीच्या अपघात मृत्यू झाला. हेल्मेट घालण्याचे ते कधी चुकवीत नव्हते; मात्र अपघाताच्या दिवशी त्यांनी हेल्मेट घातले नाही, त्यामुळे डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तरुणांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा. 

- लिब्रेटा इराणी 

Web Title: Helmet Save Lives of a Person