"अल्लाचे बंदे' पूरग्रस्तांच्या मदतीला 

flood help
flood help

पुणे : कोल्हापूर व सांगली परिसरातील पूरग्रस्तांसाठी समाजातील विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. आज पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बकरी ईदचा सण साजरा करताना मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज पठणानंतर पूरग्रस्तांसाठी प्रार्थना केली. तसेच, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्यात आला. त्यातून मुस्लीम बांधव पूरग्रस्तांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करणार आहेत. मुस्लीम बांधवांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. 

जुन्नर शहरातील ईदगाह मैदानावर हाफीज मौलाना इम्रान बेग यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज पठण व दुवा पठण हा प्रमुख धार्मिक कार्यक्रम झाला. या वेळी पूरग्रस्तांसाठी प्रार्थनाही करण्यात आली. तसेच, पूरग्रस्तांसाठी मदत निधी जमा करण्यात आला. 
बारामती शहर व परिसरात ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाजपठण केले. या वेळी कोल्हापूर व सांगली भागात पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, मुस्लिम बांधवांनी या प्रसंगी पूरग्रस्तांसाठी निधीही गोळा केला. 

दौंड शहरात मुस्लिम बांधवांकडून पूरग्रस्तांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यासह 46 हजार रुपयांचा मदत निधी संकलित करण्यात आला आहे. या वेळी जुबेर सय्यद, हमीद शेख, दानिश शेख, हसन शेख, ख्वाजा शेख, नगरसेवक शहानवाझ पठाण, कुमेल कुरेशी, अझगर काझी, आदी तरुणांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी एकूण 46 हजार रुपयांचा निधी संकलित केला. 
दरम्यान, दौंड शहरात भीमा नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणानंतर जामा मशिदीचे मौलाना महम्मद रहेमतुल्लाह यांनी पूरग्रस्तांसाठी प्रार्थना केली. धर्मसंदेश देताना ते म्हणाले, ""महापुरामुळे मोठी हानी झाली आहे. पूरग्रस्त अनेक अडचणींना तोंड देत असून, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीची फार गरज असून, त्यांना साह्य करावे.'' 

शिरूर तालुक्‍यातील न्हावरे व निर्वी येथे ईद साधेपणाने साजरी करून पूरग्रस्तांना यथाशक्ती मदत करण्याचा निर्णय मुस्लिमांनी घेतला असल्याची माहिती जमातीचे अध्यक्ष शकीलभाई मणियार यांनी दिली. आज सकाळी बकरी ईदनिमित्त न्हावरे व निर्वी येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी मौलानांनी ईदविषयी मार्गदर्शन करून कोल्हापूर- सांगली येथील पूरग्रस्तांना होता येईल तेवढे मदत करण्याचे आवाहन केले. तसेच, गरजेच्या वस्तू जमा करून पूरगस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

इंदापूर येथील ईदगाह मैदानावर बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठाण केले. या वेळी मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी निधीचे संकलन केले. 

इंदापूर तालुक्‍यातील निमगाव केतकी येथे पूरग्रस्तांसाठी व परिसरातील दुष्काळ हटावा, यासाठी सामूहिक दुआ मागण्यात आली. वरकुटे खुर्द येथील अभिनेते रियाज शहानूर मुलाणी हे परिसरातील मुस्लिम बांधवांनी पूरग्रस्तांसाठी जमा केलेले खाद्यपदार्थ व कपडे घेऊन सांगलीला गेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com