esakal | 'कोविड उपचार केंद्र उघडणाऱ्या खासगी हॉस्पिटलला सहकार्य करू'
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Home Minister

'कोविड उपचार केंद्र उघडणाऱ्या खासगी हॉस्पिटलला सहकार्य करू'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या उपचारासाठी ऑक्सिजन बेडची संख्या कमी पडत आहे. मंचर, घोडेगाव, लोणी, रांजणी, अवसरी खुर्द, पारगाव येथील खासगी हॉस्पिटलने पुढाकार घेऊन कोविड उपचार केंद्र सुरू करावीत. उपचार केंद्रांसाठी ऑक्सिजन, रेमडिसेवीरचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात होण्यासाठी शासनामार्फत सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

“वळसे पाटील यांच्या आवाहनाला खासगी हॉस्पिटल चालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या दोन दिवसांत मंचर येथील गेटवेल हॉस्पिटल व घोडेगाव येथील पोतनीस हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार केंद्र सुरु होऊन किमान ६० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. आठवड्यात मंचर येथे अजून एका खासगी हॉस्पिटलमध्ये ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.” अशी माहिती शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.

हेही वाचा: पुण्यातील रेमडेसिव्हिर नियंत्रण कक्षातील हेल्पलाइन ठरली ‘हेल्पलेस’ 

पूर्वी कुटुंबातील एखादी व्यक्ती कोरोना बाधित आढळून येत होती. पण सध्या काही ठिकाणी तर कुटुंबातील तीन किंवा चार व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.त्यामुळे ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू झाली आहे.बेड मिळतच नसल्याने रुग्णाला घरी ठेवावे लागते. त्यातूनच आजार वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्सिजन बेडची समस्या दूर करण्यासाठी शहा यांनी मंचर, घोडेगाव येथील हॉस्पिटल चालाकांबरोबर चर्चा केली. प्रांत अधिकारी संराग कोडीलकर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवमाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी संबंधित खासगी हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली आहे. अन्य खासगी हॉस्पिटल चालकांचा कोविड उपचार केंद्र सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सध्या मंचर येथे उपजिल्हा रुग्णालय, संजीवन, श्री विनायक, मातोश्री, गुजराथी, मॅक्स केअर, सिटी, अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय व पारगाव येथील आधार हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण वाढत्या कोरोना बाधित रुग्ण संख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहे.त्यामुळे कोरोना उपचार केंद्र वाढविण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्रात कुठल्या क्षेत्रातल्या कामगारांना किती आर्थिक मदत देणार समजून घ्या....

आंबेगाव तालुक्यात कोविड उपचार केंद्र सुरु करण्यासाठी इच्छुक असलेल्या व शासनाच्या निकशात बसत असलेल्या खाजगी हॉस्पिटल चालकांनी मंचर येथे प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करावा. प्राप्त अर्जानुसार संबंधित हॉस्पिटलची पाहणी केली जाईल. शासनाच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या हॉस्पिटलला कोविड उपचार सुरु करण्यास ताबडतोब परवानगी दिली जाईल. -डॉ. अंबादास देवमाने, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मंचर.