अक्षय शिंदे फाऊंडेशनचा गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात 

संतोष शेंडकर
रविवार, 24 जून 2018

सोमेश्वर : येथील अक्षय शिंदे फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या 29 मुलामुलींचा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या मुलामुलींना प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्येकी अकरा हजार रूपयांची मदत करण्यात आली. याशिवाय वंचित घटकातील दोन मुलींना पोलिस प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

सोमेश्वर : येथील अक्षय शिंदे फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या 29 मुलामुलींचा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या मुलामुलींना प्रवेश प्रक्रियेसाठी प्रत्येकी अकरा हजार रूपयांची मदत करण्यात आली. याशिवाय वंचित घटकातील दोन मुलींना पोलिस प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

निंबूत येथील बा. सा. काकडे विद्यालय, खंडोबाचीवाडी माध्यमिक विद्यालय, सोरटेवाडी माध्यमिक विद्यालय, सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, सोमेश्वर विद्यालय करंजे, न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व कनिष्ठ महाविद्यालय, मु. सा. काकडे कनिष्ठ महाविद्यालय, सह्याद्री इंग्लिश मिडियम, सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल मुरूम या शाळांमधील प्रथम आलेला मुलगा व मुलगी यांना शिंदे फाऊंडेशनच्या वतीने हेमंत निकम यांच्या हस्ते प्रत्येकी अकरा हजार रूपयाचा धनादेश व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी या मुलांच्या यशात योगदान देणारे पालक व शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे होते. याप्रसंगी तिरूपती बालाजी अॅग्रो कंपनीचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, व्यवस्थापक संजय शिंदे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतीश सकुंडे, योगेश सोळसकर, महेश जगताप, मुख्याध्यापक राजेंद्र पवार, एम. डी. बाबर, युवराज खोमणे आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी वंचित घटकातील सारिका घुंगरू भोसले व अंजली प्रदीप काळे या दोघींना बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच पोलिस प्रशिक्षणासाठी प्रत्येकी दहा हजार रूपयांची मदतही करण्यात आली. पालक-विद्यार्थ्यांशी बोलताना निकम म्हणाले, कित्येक लोक आखाड पार्ट्यावर लाखो रूपये खर्च करतात. परंतु, त्यांना वंचित माणसं दिसत नाहीत. अक्षय शिंदे फाऊंडेशन मात्र मोठी जबाबदारी पार पाडत आहे. मुलांनीही दहावी, बारावीतील सन्मानावर थांबू नये. ही सुरवात आहे. पुढे प्रचंड स्पर्धा आहे. एखाद्या शाखेकडे का जायचे आणि जाऊन काय करायचे हे आताच निश्चित असूद्या. कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी त्या क्षेत्रातले मातब्बर बना. केवळ प्रशासनातच नव्हे तर चांगल्या लोकांची राजकारणातही गरज आहे.

प्रमोद काकडे यांनी, परिसरातील मुलांना परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित रहावे लागणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. सोमनाथ रंधवे या ऊसतोड मजुराच्या 92 टक्के मिळालेल्या मुलाने मनोगत व्यक्त करत उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू उभे केले. दीप्ती सोनवणे हिनेही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संतोष शेंडकर यांनी केले. सूत्रसंचालन बाबुलाल पडवळ यांनी केले तर राजेंद्र बालगुडे यांनी आभार मानले.

Web Title: Helpful students of Akshay Shinde Foundation