मदतकार्यातून माणुसकीचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुळा, पवना, इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुराने गेले तीन दिवस शहरात थैमान घातले. निवासी भागात पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. त्यासाठी अग्निशामक व आपत्ती निवारण विभागाला राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासह शहरातील स्वयंसेवी संस्थांची मदत मिळाली.

पिंपरी : शहरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते धावून आले. महापालिकेचे अग्निशामक दल व आपत्ती निवारण विभागाला कार्यकर्त्यांची साथ मिळाल्याने मदतकार्य प्रभावीपणे राबविता आले. काही नागरिकांनी पूरग्रस्तांना आपल्या घरी आश्रय दिल्याने माणुसकीचे दर्शनही घडले. 

मुळा, पवना, इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुराने गेले तीन दिवस शहरात थैमान घातले. निवासी भागात पुराचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. त्यासाठी अग्निशामक व आपत्ती निवारण विभागाला राष्ट्रीय आपत्ती निवारण दलासह शहरातील स्वयंसेवी संस्थांची मदत मिळाली. यात सुवर्णयुग ढोलताशा पथक, रॉबिन हूड आर्मी, सीझन ग्रुप, ढोरे मित्र मंडळ, शितोळेनगर मित्र मंडळ, साईचौक मित्रमंडळ आदींचा समावेश होता. बचाव पथकाने पुरातून बाहेर काढलेल्या नागरिकांना स्थलांतर ठिकाणी (शिबिर ठिकाण) घेऊन जाण्याचे कार्य स्वयंसेवकांनी केले. प्रदीप स्वीट मार्टतर्फे साडेचारशे ब्लॅंकेट महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाकडे सुपूर्द केले. अग्निशामक दलाचे 125 जवान व सात वाहने अद्यापही तैनात आहेत. आठ बोटींच्या मदतीने त्यांनी पूरग्रस्तांना बाहेर काढले होते. 

विद्यार्थ्यांना आश्रय 
जुनी सांगवीतील श्रीदत्त आश्रमात मुळा नदीच्या पुराचे पाणी शिरले होते. येथील 12 विद्यार्थी व साधकांना स्थानिक नागरिक रामचंद्र शेलार, अतुल कुरकुरे, प्रवीण कुरकुरे, गुरुप्रसाद कुलकर्णी व ज्ञानेश्‍वर कुलकर्णी यांनी आपल्या घरी आश्रय देऊन त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली. आश्रमाच्या इमारतीत तळ मजल्यावर दहा फुटांपर्यंत पाणी होते. बुधवारी पूर ओसरल्यानंतर टॅंकरमधून पाणी आणून आश्रम धुवून काढला. यासाठी अरुण पवार यांनी टॅंकरची व्यवस्था केली. आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेविका माई ढोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आश्रमाला भेट देऊन पाहणी केली. 

चिंचवडमध्ये मदत 
रॉबिनहूड आर्मी संस्थेचे स्वयंसेवक चिंचवड, वाल्हेकरवाडी, वाकड, हिंजवडी भागांतील सुमारे साडेचारशे पूरग्रस्तांना दोन दिवसांपासून सकाळ-संध्याकाळचे जेवण देत आहेत. आवश्‍यकतेनुसार वैद्यकीय मदत, औषधे आणि ब्लॅंकेट्‌स पुरविली आहेत. समन्वयक राहुल पाटील, प्राजक्ता रुद्रवार, दत्तात्रेय चौधरी यांच्यासह 150 स्वयंसेवकांनी मदतकार्यात सहभाग घेतला. 

थिसेनक्रूप उद्योगसमूहाने भाटनगर, दापोडी, काळेवाडी, सांगवी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे निलख भागांत साडेपाच हजार पूरग्रस्तांच्या नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था केली. कंपनीचे मनुष्यबळ विकासप्रमुख संचालक राजेंद्र नागेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिकारी मनोज राणे, युनियन अध्यक्ष रामचंद्र वाईंगडे, सरचिटणीस विपुल बिरंजे, वसंत हिरे आदींनी संयोजन केले. 

फॅमिली फिजिशियन असोसिएशनतर्फे कस्पटे वस्ती, वाकड, सांगवी भागात डॉक्‍टरांचे 20 पथके तैनात आहेत. त्यांच्या मार्फत पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत पुरविली जात आहे. सर्दी-खोकला, उलट्या-जुलाबाचा त्रास नागरिकांना होत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनराज हेळंबे यांनी सांगितले. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाने संत तुकारामनगर, चिंचवड परिसरातील घरांमधून सुमारे 26 हजार पोळ्यांचे संकलन करून पूरग्रस्तांना वितरित केल्या. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेखर ओव्हाळ युवा मंचातर्फे कासारवाडी येथील उर्दू विद्यालय, फुगेवाडीतील मीनाताई ठाकरे आणि दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळेत पूरग्रस्तांना ब्लॅंकेट, जीवनावश्‍यक वस्तू आणि खाद्यपदार्थांचे वाटप केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: helping hand for flood area