#NavDurga भारतीय संस्कृतीचा वारसा तंत्रज्ञानाद्वारे जगभर 

नीला शर्मा 
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

भारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर स्थापत्य अशा अनेक बाबतींत तिनं प्रसृत केलेली माहिती वाचकांना या विषयांकडे आकर्षित करत असते. 

भारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर स्थापत्य अशा अनेक बाबतींत तिनं प्रसृत केलेली माहिती वाचकांना या विषयांकडे आकर्षित करत असते. 

‘बोधसूत्र’ या ब्लॉगवर धनलक्ष्मी टिळे किती तरी प्राचीन संदर्भांना उजाळा देते. नुसताच इतिहास सांगणं, ही गोष्ट रुक्ष ठरू शकते. रंजकता वाढवण्यासाठी काही रोचक तपशील सोप्या शब्दांत मांडणं हे ब्लॉगमधून साधता येतं, असं तिला वाटतं. वर्तमानपत्रासारख्या माध्यमातून भारतीय वारसा सर्वसामान्यांपर्यंत न्यायला शब्दमर्यादा पाळावी लागते. मात्र, ब्लॉगवर विस्तृत लेखन, तेही भरपूर चित्रं वापरून करता येण्याचा तिला फायदा झाला. 

धनलक्ष्मी म्हणते, ‘‘प्रकाश व जयमाला इनामदार यांची मी मुलगी. ‘गाढवाचं  लग्न’सारखं वगनाट्य करणाऱ्या या दोघांकडून अभिनयाचं बाळकडू मिळाल्यानं दहावीत असल्यापासून मीही रंगभूमीवर काम करू लागले. बाबा गेल्यावर मला ते काम करवेना. इतिहास, पुराणकथांकडे माझा ओढा होताच. पाश्‍चात्त्य चित्रकलाही आवडू लागली होती. या दोन्हींमुळे असेल कदाचित, भारतीय चित्रकलेच्या इतिहासाचा अभ्यास हवासा वाटला. तो करताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील भारतविद्या या विषयाच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती कळली. त्यामुळे वेद, पुराण, पुराभिलेखशास्त्र, मंदिर स्थापत्य वगैरेंचं वेगळंच जग माझ्यासमोर खुलं झालं. ‘बोधसूत्र’ या माझ्या ब्लॉगच्या मुळाशी हे सगळं आहे.’’

धनलक्ष्मीनं आतापर्यंत काही शोधनिबंधही लिहिले आहेत. त्या निमित्तानं जुन्या काळातील तिला नव्यानं आढळणाऱ्या गोष्टी ती ब्लॉगवर लिहिते. याचं रूपांतर अलीकडेच तिनं वेबसाइटमध्येही केलं आहे. ‘उष्णीष ते पुणेरी पगडी ः शिरोवस्त्राचा प्रवास,’ ‘राजाधिराज कुबेर’ यांसारख्या तिच्या लेखांना व रेखाचित्रांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. ‘गुगल ड्राइव्ह : संशोधकाचा आधुनिक सोबती’ या लेखात ती अभ्यासकांना कमी वेळात जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचं तंत्र सांगते.

‘बालकला’ या तिच्या संस्थेच्या माध्यमातून, पती महेश टिळे यांच्या सोबतीनं ती मुलांना चित्रकलेचे धडे देते. मराठीतल्या म्हणी आधुनिक पिढीला समजाव्यात म्हणून ‘सुगम हॅशटॅग’ तिनं सुरू केला. पाकिस्तानातील प्राचीन काळचं सूर्यमंदिर, कोल्हापूरमध्ये आढळलेला ‘पोसिडोन’ या रोमन देवतेचा पुतळा, अशा विविध प्रकारच्या माहितीतून धनलक्ष्मी भारतीय वारसा तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभर नेत आहे. त्याबद्दल कुतूहल वाढवण्याचं मोठंच काम तिनं केलं आहे. 

Web Title: The heritage of Indian culture, through technology