पुणे : बनकरफाटा ते जुन्नर रस्त्याचा भराव गेला वाहून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

येथील बनकरफाटा ते जुन्नर या रस्त्याचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. अष्टविनायक जोडमार्ग पूर्ण होण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्याची नामुष्की ओढवली असल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

‌जुन्नर : येथील बनकरफाटा ते जुन्नर या रस्त्याचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. अष्टविनायक जोडमार्ग पूर्ण होण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्याची नामुष्की ओढवली असल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दोन म्हणून ओळखला जाणारा बनकरफाटा ते जुन्नर या रस्त्याचे काम तीर्थक्षेत्र विकास आराखडा अष्टविनायक जोड रस्ता अंतर्गत सुरू या मार्गावरील गणपती फाटा येथे झालेल्या जोराच्या पावसामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाने रस्त्याचा भराव वाहून गेला आहे. नाल्याचे पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.

ठेकेदाराने नाल्याचे काम करताना दगडी बांध घालणे गरजेचे होते त्याऐवजी केवळ मुरूम वापरून भराव केला असल्याने पाण्याच्या प्रवाहाने तो वाहून गेला आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे झाले असून  भराव चांगल्या प्रकारे न केल्याने खचणे, वाहून जाणे असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. रस्त्याच्या कामासाठी चांगल्या प्रतीचा मुरूम वापरला नाही अनेक ठिकाणी मातीचा वापर केला असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी होत्या मात्र संबंधित कार्यालय पुणे येथे असल्याने कामाच्या बाबत तक्रार नोंदविणे नागरिकांना शक्य होत नाही.

या संपुर्ण रस्त्याच्या कामाची वरिष्ठांकडून पाहणी होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी याबाबत माहिती घेतो असे सांगितले. या कामावर देखरेख ठेवणे तसेच गुणवत्ता तपासणी यासाठी नऊ पर्यवेक्षक नेमले असल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hevay rain impact road damage in junnar