तरुणीला सुरक्षा देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मे 2019

आंतरजातीय प्रेमप्रकरणाच्या विरोधातून काका व चुलतभावांकडून छळ होत असून, जिवाला धोका आहे, असा आरोप करणाऱ्या तरुणीच्या याचिकेची दखल घेत मुंबई न्यायालयाने मंगळवारी (ता. ७) तिच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आदेश तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिले.

तळेगाव स्टेशन -  आंतरजातीय प्रेमप्रकरणाच्या विरोधातून काका व चुलतभावांकडून छळ होत असून, जिवाला धोका आहे, असा आरोप करणाऱ्या तरुणीच्या याचिकेची दखल घेत मुंबई न्यायालयाने मंगळवारी (ता. ७) तिच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचे आदेश तळेगाव एमआयडीसी पोलिसांना दिले. त्यानंतर गुरुवारी (ता. ९) रात्री उशिरा तिने काका व चुलतभांविरोधात फिर्याद दिली. 

प्रियांका संतोष शेटे (वय १९, सनराईज अपार्टमेंट, संस्कारनगर, दौंड, पुणे) असे फिर्यादी तरुणीचे नाव आहे. प्रियांकाचे परजातीतील एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून तिचे चुलते व भावांनी तिला तळेगावातील घरातून शेटेवस्ती, नवलाख उंबरे येथे नेऊन मारहाण केली. प्रियांका आईवडील आणि बहिणींसोबत रेल्वेने तिरुपती बालाजीला दर्शनासाठी निघाली होती. दरम्यान, दौंड रेल्वे स्टेशनवर उतरून ती संबंधित मुलासोबत पळून गेली. या घटनेनंतर रवी शेटे याने मुलाचे वडील मोहन अवघडे यांना फोन करून त्या दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, तरुणीने ॲड. नितीन सातपुते यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर प्रियांकाने चुलते दत्तात्रेय बंडू शेटे आणि चुलतभाऊ रवी निवृत्त शेटे, संपत ज्ञानेश्‍वर शेटे (सर्व रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) या तिघांविरोधात फिर्याद दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High court order to protect the woman