राज्यात दोन दिवस उष्णतेची लाट; पुण्याचा पारा 42.9 वर

राज्यात दोन दिवस उष्णतेची लाट; पुण्याचा पारा 42.9 वर

पुणे : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शनिवारी या हंगामातील उच्चांकी तापमान नोंदविले गेले. अकोल्यात राज्यासह देशातील 46.7 अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. राज्यात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता असून, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी रात्रीचे तापमानही तुलनेने जास्त राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
 
देशात सलग दुसऱ्या दिवशी अकोल्यात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमान नोंदविले गेले. हवामानशास्त्र विभागातर्फे विविध शहरांमध्ये मोजण्यात आलेल्या कमाल तापमानात तब्बल नऊ ठिकाणी 45 अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.
 
तापमानाच्या पाऱ्याने उच्चांकी पातळी गाठल्याने उन्हाचा कडाका असह्य होऊ लागला आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. उन्हाचा हा कडाका आणखी काही दिवस राहण्याची शक्‍यता आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रविवारी (ता. 28) उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी रात्री तापमान जास्त राहणार आहे. 

पुण्यात उच्चांकी तापमान 
पुण्यात 42.9 अंश सेल्सिअस या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद शनिवारी झाली. शहर आणि परिसरात दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. 

'फणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार 
बंगालच्या उपसागरात "फणी' चक्रीवादळ घोंघावत असून, हे वादळ रविवारी अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसासह येत्या दोन दिवसांत तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला हे वादळ धडकण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वारे वेगाने फिरत असल्यामुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्‍यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. 

उच्चांकी तापमान  
- मध्य महाराष्ट्र : पुणे (42.9), नगर (45.1), जळगाव (45), सोलापूर (43.1) 
- कोकण-गोवा : मुंबई (34), रत्नागिरी (32.6), पणजी (33.6) 
- मराठवाडा : उस्मानाबाद (43.6), औरंगाबाद (43.6), बीड (44.4) 
- विदर्भ : अकोला (46.7), अमरावती (46), ब्रह्मपुरी (46.4), चंद्रपूर (46.5), वर्धा (46) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com