राज्यभर होरपळ! परभणी, चंद्रपूर, अकोल्याचा पारा 47 अंशांपार; उष्णतेची लाट कायम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

राज्यात सर्वाधिक तापमान परभणी, चंद्रपूर आणि अकोला या तिन्ही ठिकाणी 47.2 होते.

पुणे : उन्हाच्या चटक्‍यात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः होरपळत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या "फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने रविवारी दिला.

राज्यात सर्वाधिक तापमान परभणी, चंद्रपूर आणि अकोला या तिन्ही ठिकाणी 47.2 होते. विदर्भाखालोखाल मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली आहे. हवामान शास्त्राच्या परिभाषेत "ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 
पुण्यासह नगर, जळगाव, सातारा, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, बह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे उष्णतेची मोठी लाट निर्माण झाली आहे. या भागात सलग चौथ्या दिवशी उष्णतेची लाट कायम राहणार आहे. रात्रीच्या वेळी तापमान वाढून रात्रदेखील उष्ण ठरण्याची शक्‍यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.

देशातील गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, चंडीगढ आणि ओडिशा या भागांतदेखील उष्णतेची लाट पसरली आहे. त्याच वेळी बंगालच्या उपसागरात "फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. पूर्व किनारपट्टीकडे झेपावत असलेल्या चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेशालगत समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्‍यता आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडूमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ येत्या मंगळवारपर्यंत (ता. 30) तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येणार आहे. 

अकोला जगात सर्वांत उष्ण 
अकोला हे रविवारी (ता. 28) जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले आहे. जगातील दहा उष्ण ठिकाणांत महाराष्ट्रातील अकोल्यासह चंद्रपूर, बह्मपुरी, अमरावती, वर्धा या पाच ठिकाणांचा समावेश आहे. तर नागपूर, परभणी, यवतमाळ, नगर यांचा पहिल्या 15 उष्ण ठिकाणांमध्ये क्रमांक लागला आहे. अमेरिकेतील "अल-डोरॅडो वेदर' या हवामानविषयक नोंदी घेणाऱ्या जागतिक संकेतस्थळावर दररोज ही माहिती मिळते. 

दृष्टिक्षेपात राज्यातील तापमान (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये) 
पुणे ..........43 
जळगाव .... 45.4 
कोल्हापूर ... 37.7 
महाबळेश्‍वर .. 36.1 
मालेगाव ..... 44.2 
नाशिक ...... 42.8 
सांगली ...... 40 
सातारा ...... 42.1 
सोलापूर ...... 44.3 
मुंबई ...... 34.5 
रत्नागिरी ...... 32.7 
उस्मानाबाद ...... 43 
औरंगाबाद ...... 43.6 
परभणी ...... 47.2 
नांदेड ...... 44.6 
बीड ...... 45.1 
अकोला ...... 47.2 
अमरावती ...... 45.8 
नागपूर ...... 44.9 

Web Title: High Temperature in Maharashtra Parbhani Chandrapur Akola temperature was above 47 degree