उच्चशिक्षण, संशोधनासाठी भरीव तरतूद

उच्चशिक्षण, संशोधनासाठी भरीव तरतूद

पुणे विद्यापीठाचा ६७८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर  

पुणे - विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण, संशोधन, उद्योजकता विकास यासाठी भरीव तरतूद असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ६७८ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास आज (ता.११) अधिसभेने मंजुरी दिली.

विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांच्या कल्याणकारी योजनेसाठी ८ कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांच्या उपस्थितीत वित्त व लेखा अधिकारी डॉ. विद्या गारगोटे यांनी अर्थसंकल्प मांडला. ५७६ कोटी रुपये जमेचा आणि १०२ कोटी रुपये तुटीचा हा अर्थसंकल्प आहे.

विशेष विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद.
विद्यार्थ्यांसाठी सातत्याने शैक्षणिक मार्गदर्शन आणि अभ्यासवर्गांच्या आयोजनासाठी ५० लाख.
नोकरीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्लेसमेंट सेल उभारण्यात आले आहेत. त्यासाठी २० लाख.
कमवा आणि शिका योजनेअंतर्गत विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ७ कोटी.
विद्यार्थ्यांना आपत्कालीन सहायक आणि सुरक्षा विमा योजनेसाठी ४० लाखांची तरतूद.
विद्यार्थी कल्याण मंडळाच्या देखभाल आणि विकासासाठी १० कोटींची तरतूद.
विद्यार्थी वसतिगृह देखभाल आणि विकासासाठी ३ कोटी ४७ लाख रुपये.
नवीन पीएचडी वसतिगृहासाठी एक कोटी. ११० मुली, १८० मुलांसाठी वसतिगृह
क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुल. त्यासाठी पाच कोटी.
विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाद्वारे शिक्षणाची संधी मिळावी म्हणून ५० लाख रुपयांची तरतूद.
विद्यार्थ्यांना जीवनकौशल्ये आणि संभाषण कौशल्य देण्यासाठी सव्वा कोटी रुपयांची तरतूद.

संशोधन विकास केंद्रे : विद्यापीठातील प्राध्यापक त्यांचे शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करतात. त्याची एकत्रित माहिती, या शोधनिबंधाचे इतरांनी वापरलेले संदर्भ (सायटेशन इंडेक्‍स) याची एकत्रित माहिती संकलनासाठी संशोधन संकेतस्थळाचा प्रकल्प विद्यापीठाने हाती घेतला आहे. त्यासाठी २१ लाखांची तरतूद.

उद्योजकता विकास केंद्र : विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना सत्यात आणण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ, मार्गदर्शन आणि उद्योगांची मदत लागते. यातून त्यांना स्टार्टअप तयार करता यावे म्हणून उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी ५३ लाखांची तरतूद.

संशोधन गुणवत्ता : विद्यापीठातील शैक्षणिक विभागांबरोबरच महाविद्यालयांच्या गुणवत्ता विकासासाठी अर्थसंकल्पात २३ कोटी रुपयांची तरतूद आहे. यातून शास्त्रीय, प्रयोगशाळा उपकरणे, फोटोकॉपी यंत्रे, प्रिंटर, पार्किंग, स्वच्छतागृहे, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था आदी कामे करता येतील.

कुलगुरू डॉ. गाडे यांची शेवटची सभा 
गेल्या दहा वर्षांच्या खंडानंतर प्रथम अधिसभा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील ज्ञानेश्‍वर सभागृहात झाली. नवा विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतरची ही पहिली अधिसभा होती. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांचा कार्यकाळ १५ मे रोजी संपत आहे. त्यांच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा होती.

विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांचे सबलीकरण आणि त्यांना विविध सुविधा देण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. विशेष विद्यार्थ्यांसाठी केंद्र सुरू करण्याबरोबरच संशोधक विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्यासाठी उद्योगांच्या मदतीने केंद्रही सुरू केले आहे.

- डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com