उच्च शिक्षणही होणार 'ऑनलाइन'

उच्च शिक्षणही होणार 'ऑनलाइन'

पुणे : पारंपरिक पद्धतीप्रमाणे क्‍लासरूममध्ये बसून उच्च शिक्षणाबरोबरच आता "ऑनलाइन'द्वारेही शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) काही दिवसांपूर्वी सर्व पात्र उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून ऑनलाइन अभ्यासक्रम राबविण्यासंदर्भातील अर्ज मागविले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठदेखील दोन व्यावसायिक अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविण्याच्या तयारीत आहेत. 
देशात उच्च शिक्षण मिळविण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम राबविण्याला प्राधान्य मिळणार आहे.

सध्या विद्यार्थी नियमित वर्गांमध्ये, दूर शिक्षणाद्वारे तसेच महाविद्यालयात किंवा विद्यापीठातील पूर्णवेळ अभ्यासक्रमाद्वारे पदवी मिळवू शकतात. मात्र, सरकारने 2017 पासून "मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स'च्या (एमओओसी) व्यासपीठाद्वारे ऑनलाइन अभ्यासक्रमाचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. तसेच अनेक खासगी विद्यापीठांनी ऑनलाइन कोर्सेसही ऑफर केले जातात; परंतु त्याला अनुदान आयोगाची मान्यता नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, आता आयोगामार्फतच ऑनलाइन अभ्यासक्रम राबविण्याला प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे आगामी काळात हे चित्र निश्‍चितच बदलेल, असा विश्‍वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

आयोगाच्या नव्या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना ऑनलाइन कोर्सेसद्वारे पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय काही कारणांमुळे महाविद्यालयात अथवा प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन शिक्षण घेऊ न शकणाऱ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार आहे. 

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही एम.बी.ए. आणि डेटा ऍनॅलिटिक्‍स (पदवी किंवा पदविका) हे दोन ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार होत आहे. डेटा ऍनॅलिटिक्‍समध्ये पदविका की पदवी अभ्यासक्रम सुरू करायचा, हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. मात्र तो सुरू करण्यापूर्वी या दोन्ही अभ्यासक्रमासंदर्भातील ई-अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येईल. त्याशिवाय व्हर्च्युअल क्‍लासरूमही कार्यान्वित करण्यात येणार आहे.'' 

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com