मोसमातील सर्वाधिक पाऊस पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

 यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सर्वाधिक पाऊस पुण्यात कोसळला आहे. जून ते सप्टेंबर यादरम्यान पुण्यात सरासरीच्या तुलनेत १०९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

पुणे - यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सर्वाधिक पाऊस पुण्यात कोसळला आहे. जून ते सप्टेंबर यादरम्यान पुण्यात सरासरीच्या तुलनेत १०९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पुण्या-मुंबईसह आठ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असला; तरीही सोलापूर, बीड, लातूर, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे अद्यापही तहानलेलेच असल्याचे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून दिसून येते.

राज्यात पावसाळ्यातील चार महिन्यांमध्ये सरासरी १००४.२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा सरासरीपेक्षा ३२ टक्के जास्त पाऊस पडला; म्हणजे राज्यात या वर्षीच्या पावसाळ्यात १३२८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.  मराठवाड्यातील आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र, ऑगस्टपासून दमदार पावसाला सुरवात झाली. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमधील नद्या सतत धोक्‍याच्या पातळीवरून वाहत होत्या. पुण्यात सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली.

पुणे जिल्ह्यात जून ते सप्टेंबरयिादरम्यान पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत १०९ टक्के पाऊस पडला असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. यंदा ३० सप्टेंबरपर्यंत १०७१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highest rainfall in Pune