महामार्ग नव्हे, अडथळ्यांची शर्यत

Highway work accident
Highway work accident

पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच, अशी भावना वाहनचालकांची होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना रखडलेला पुणे-सातारा महामार्ग म्हणजे माझ्या विभागावर काळा डागच आहे, अशी स्पष्ट दिलेली प्रतिक्रिया या रस्त्याच्या स्थितीची नेमकी अवस्था काय हे दाखवून देते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या ठेकेदारासमोर अक्षरशः लोटांगणच घातले आहे.

पुणे-सातारा महामार्गाच्या देहूरोड ते सातारा या १४० किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी १९९९ मध्ये भूसंपादनाची प्रक्रिया चालू होऊन ६० मीटरचे भूसंपादन करण्यात आले व प्रत्यक्षात २००४ मध्ये चारपदरीकरणाचे काम चालू झाले. हे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच २०१० मध्ये रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम चालू करण्यात आले. डीबीएफओटी (डिझाइन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्स्फर) या तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्रा या कंपनीस या कामाचा ठेका दिला गेला. तब्बल १७२४ कोटी रुपये किमतीच्या या कामासाठी २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी या कंपनीस देण्यात आली आहे व हे काम मार्च २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, २०१९ आले तरी काम पूर्ण नाही व येत्या दोन ते तीन वर्षांतदेखील पूर्ण होते की नाही, याबाबत शंका आहे.

या रखडलेल्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्थानिक शेतकऱ्यांची अडवणूक, संपादित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमण, वन खात्याच्या ताब्यातील जमीन मिळण्यास झालेला उशीर, अशी कारणे देत आहेत. मात्र, या कारणांसाठीदेखील महामार्ग प्राधिकरणच जबाबदार असल्याचे दिसते.

संपादित जमिनीवरील अतिक्रमण काढणे, अडवणूक करत असलेल्या शेतकऱ्यांची योग्य कार्यवाही करून शंका समाधान करणे; तसेच वन खात्याच्या ताब्यातील जमीन संपादनासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे, याबाबत प्राधिकरणाची दिरंगाईच कारणीभूत ठरलेली दिसते.

याशिवाय ज्या ठिकाणी जागेबाबत कोणाचीही हरकत नसताना तातडीने रस्ता पूर्ण करणे गरजेचे होते, तेदेखील मार्च २०१३ च्या अगोदर झाले नाही. ठेकेदाराचे उपठेकेदार गायब होणे, पैसे न मिळाल्याने उपठेकेदाराने काम न करणे, तसेच प्रत्यक्षात कोणत्या ठिकाणी किती जागा संपादित आहे व रस्ता कसा जाणार आहे, याबाबत ठेकेदार व उपठेकेदारच अनभिज्ञ असणे ही कारणेदेखील रस्ता रखडण्यामागे तितकीच महत्त्वाची आहेत. 

२१ किलोमीटरचे काम अपूर्ण
महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी यांनी याबाबत भूमिका मांडताना सांगितले, की १४० किलो मीटरच्या प्रकल्पामधील ११९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, तर भोर तालुक्‍यात जागोजागी मिळून २१ किलोमीटरचे काम अद्याप अपूर्ण आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी मागील वेळेस सांगितले होते. आता डिसेंबर २०१८ समोर आले आहे, तरी परिस्थिती जैसे थे आहे. अनेक ठिकाणी असलेले वाद बहुतांशी मिटलेले आहेत. तेथील जमीनदेखील महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात आली आहे. काही ठिकाणी तातडीने रस्त्याचे काम चालू करून फक्त माती व मुरूम टाकून ठेवले गेले. त्यानंतर पुन्हा काम ठप्प झाले आहे.

आश्‍वासनावर अंदोलने स्थगित
वास्तविक या रस्त्याच्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र आंदोलन करणे गरजेचे होते. काही अंदोलने झाली. मात्र, प्रत्येक वेळी प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्‍वासनावर अंदोलने स्थगित केली गेली. टोल नाक्‍यावर स्थानिकांना टोलवसुलीत सूट मिळवली की आम्ही मोठे काम केले, अशीच येथील लोकप्रतिनिधींची भूमिका राहिली आहे. यासाठी मग एक दिवस टोलवर जाऊन काम थांबवायचे, आमच्या जमिनी गेल्या आहेत. आम्हाला टोलमाफी झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडायची व स्थानिकांना टोलमाफी घ्यायची किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठी पासेस घ्यायचे हेच अत्तापर्यंतच्या आंदोलनाचे फलित निघाले आहे. मात्र, आत्तापर्यंत या अपूर्ण रस्त्यामुळे अपघातात गेलेले बळी यामध्ये या तालुक्‍यातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्याबाबत कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे. रस्त्याचे काम थांबले नाही पाहिजे, अशी अग्रही भूमिका घेताना कोण दिसत नाही.

महामार्ग म्हणजे काय रे भाऊ? - महेंद्र शिंदे, खेड शिवापूर
कात्रज बोगदा ओलांडून काही अंतर पुढे आल्यास मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्यावर आणि सेवा रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर अशी सर्कस करत तुम्हाला वाहन चालवावे लागते. थोडे पुढे आलात की वेळू फाट्यावर उड्डाण पुलाच्या सुरू असलेल्या कामात तुमचे वाहन अडकते. त्यातून बाहेर पडत कोंढणपूर फाटा ओलांडला की दर्गा चौकात खेड-शिवापूर आणि कासुर्डीला वळणारी वाहने तसेच रस्ता ओलांडणारी शाळकरी मुले आणि नागरिकांच्या गर्दीतून वाट काढत तुम्ही पुढे येता. अशा प्रकारे कसरत करत खड्ड्यांतून आदळ-आपट करत पुढे आलात की खेड-शिवापूर येथे टोल नाका तुमचे स्वागत करतो.

या रस्त्यावर सुविधा शोधूनही सापडत नसताना टोल वसुली करतात, हे पाहून तुम्ही संतापता. मात्र नाइलाजाने तुम्हाला टोल भरावाच लागतो. टोल देऊन तुम्ही पुढे आलात की शिवरे, वरवे भागात खड्डे तुमचे स्वागत करतात. तर चेलाडी फाट्यावर सेवा रस्त्यावर तुम्हाला खड्ड्यांत रस्ता शोधावा लागतो. कापूरहोळ चौकात गेल्यास उड्डाण पुलावरून जायचं की सेवा रस्त्याने जायचं? सासवडला आणि भोरला जाण्यासाठी कोठून वळण घ्यायचं? अशी गोंधळलेली तुमची अवस्था होते. या गोंधळातून पुढे गेल्यावर किकवी आणि सारोळा येथील उड्डाण पुलाच्या कामामुळे तुम्हाला वाहतूक कोंडीत अडकावे लागते. विशेष म्हणजे हा सर्व प्रवास करत असताना या मार्गावर तुम्हाला दिशादर्शक आणि काम सुरू असल्याचे फलक अभावानेच दिसतात. एकूणच शिंदेवाडी ते सारोळा आणि सारोळा ते शिंदेवाडी हा प्रवास केल्यावर ‘महामार्ग म्हणजे काय रे भाऊ’ असा प्रश्‍न मनात येतो.

रखडलेली महत्त्वाची कामे
    वेळू, दर्गा फाटा, वरवे, चेलाडी, किकवी आणि सारोळा येथील उड्डाण पुलाची कामे
    शिंदेवाडी, खेड-शिवापूर, शिवरे, वरवे, कळवडे, धांगवडी या भागांतील सेवा रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. 
    खोपी फाट्यावरील उड्डाण पुलाखालील रस्ता पूल होऊनही बंद
    संपूर्ण रस्त्यावर ड्रेनेज आणि गटारांची व्यवस्था नाही
    पथदिव्यांची उभारणी करण्यात आलेली नाही
    दिशादर्शक फलक आणि दिव्यांचा अभाव

गेल्या चौदा वर्षांपासून पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी ते सारोळादरम्यान महामार्गाचे काम चालू आहे. मात्र, हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट कामे, तर काही ठिकाणी पूर्ण कामच ठप्प आहे. वळवलेले रस्ते व काम चालू असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने अनेक अपघात होऊन प्रवाशांना प्राणास मुकावे लागले आहे. वाहतूक कोंडी तर नित्याचीच झाली आहे. या सर्व त्रासावर कहर म्हणून काय तर टोलवसुली मात्र दर वर्षी वाढ करून चालू आहे.
- किरण भदे, नसरापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com