जिल्हा बॅंकेची शिक्षकांना गूड न्यूज

संतोष शेंडकर
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी कॅश क्रेडिटची मर्यादा दहा लाख रुपये केल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. पंधरा हजार शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. प्राथमिक शिक्षक संघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सोमेश्वरनगर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी कॅश क्रेडिटची मर्यादा दहा लाख रुपये केल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. पंधरा हजार शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. प्राथमिक शिक्षक संघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना मागील वर्षभरापूर्वीच जिल्हा बॅंकेने कॅश क्रेडिट कर्जाची मर्यादा तीन लाखांहून सात लाख केली होती. आता सातव्या वेतन आयोगामुळे शिक्षकांच्या पगारात वाढ झाल्याने कॅश क्रेडिट मर्यादेत वाढ करण्याची शिक्षक संघाची मागणी होती. त्यास जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने वर्षभरातच शिक्षकांना पुन्हा दुसऱ्यांदा 10 लाखांपर्यंत वाढ दिली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, पंचायत समितीमधील कर्मचारी यांनाही या वाढीव कर्जाचा लाभ होणार आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, ""कॅश क्रेडिट घेतल्यानंतर वेतनातून मुद्दल कपात न करता फक्त व्याजाची कपात होते. त्यामुळे या कर्जासाठी मोठी मागणी असते. या निर्णयाचे स्वागत करीत आहोत.''

शिक्षकांना 10 लाखांची सीसी देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला. त्यासाठी पुरेशी तरतूदही केली आहे. तसेच, बॅंकेने शिक्षक पतसंस्था पगारदार संस्थांना 15 टक्के दराने लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चाळीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली. या दोन्ही निर्णयाबद्दल बाळासाहेब मारणे, खंडेराव ढोबळे, राजेंद्र जगताप, संतोष पानसरे यांच्या शिष्टमंडळाने थोरात यांचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hike in Cash Credit Limit For Teachers