पुणे नवरात्रोत्सवात सदाबहार हिंदी गाण्यांचे सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Girish Oak

‘यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रत्येक गोष्टींवर भरभरून प्रेम करा. चांगल्या गोष्टींचे कौतुक करा. आनंदी राहण्यासाठी स्वतःवर प्रेम करा’, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी दिला.

पुणे नवरात्रोत्सवात सदाबहार हिंदी गाण्यांचे सादरीकरण

पुणे - ‘यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रत्येक गोष्टींवर भरभरून प्रेम करा. चांगल्या गोष्टींचे कौतुक करा. आनंदी राहण्यासाठी स्वतःवर प्रेम करा’, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी दिला. ‘पुणेकर रसिक चोखंदळ आहेत. ते टपल्या मारण्यात पटाईत आहे. मात्र ते चांगले आहे, कारण त्यामुळे चुकांमध्ये सुधारणा होते’, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पुणे नवरात्रोत्सवात आयोजित ‘नॉस्टॅल्जिक मेलडीज्’ या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. ओक यांच्याशी गप्पा आणि टीएमडी प्रस्तुत हिंदी जुन्या, नवीन गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. ओक यांनी आपल्या रंगभूमीवरचा प्रवास उलगडला. तर, उत्तरार्धात डॉ. ओक यांनी सदाबहार हिंदी गीते सादर करत आपल्यातील गायकीचे दर्शन घडवले. ‘गुलाबी आँखे जो तेरी देखी’, ‘रुप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना’, ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’, ‘कोरा कागज था मन मेरा’ आदी गीतांना श्रोत्यांनीही उत्स्फूर्त दाद दिली.

डॉ. ओक यांच्यासह गायिका तेजस्विनी व्हीजी, ममता नेने, माधुरी भोसेकर, गायक गणेश मोरे, तुषार पिंगळे, कल्पेश पाटील यांनीही हिंदी चित्रपटातील जुनी नवीन गाणी सादर केली. त्यांना की-बोर्डवर अमन सय्यद, ट्रम्पेटवर असिफ खान, बासरीवर सचिन वाघमारे, गिटारवर मुकेश देढिया, तबल्यावर विशाल गंड्रतवार, ढोलकीवर रोहित साने, ऑक्टोपॅडवर ऋतुराज पोरे आणि काँगोवर सुनील गायकवाड यांनी साथसंगत केली. पुणे नवरात्रोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागूल, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, उद्योजक जयवंत जगताप, वसंत दुर्गे यांनी कलाकारांचा सत्कार केला. पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागूल तसेच पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते. ‘सकाळ’ आणि ‘साम टीव्ही’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहेत.

सलग १२ तास लावणी महोत्सव

रसिकांच्या आग्रहास्तव शनिवारी (ता. १) सलग १२ तासांचा धडाकेबाज लावणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात इश्काचा नाद खुळा (वर्षा पवार, सोनाली जळगावकर), शिवानीचा नाद खुळा (शिवानी कोरे, पूनम कापसे), लावण्य जल्लोष (सुप्रिया जावळे, कावेरी घंगाळे), जल्लोष अप्सरांचा (चतुर्थी पुणेकर, पतंजली पाटील), लावणी धमाका (वैजयंती पाष्टे, वासंती पुणेकर), अहो नाद खुळा (माया खुटेगावकर, प्रिया मुंबईकर), तुझ्यात जीव रंगला (अर्चना जावळेकर, नमिता पाटील) असे महाराष्ट्रातील सात नामवंत लावणी ग्रुप सुमारे शंभर सहकलावंतांसह रंगमंचावर आपली अदाकारी सादर करणार आहेत.