
Pune : आदर्श गाव भागडीत हिंदू मुस्लिम ऐक्याची शंभर वर्षाची परंपरा. पिरचंद साहेब दर्गा
मंचर : आदर्शगाव भागडी गावात एकही मुस्लिम कुटुंब राहत नाही. पिरचंदसाहेब, महादेव मंदिर व मारुती मंदिरे शेजारीशेजारी आहेत. दर्गा व दोन्ही मंदिराची दैनंदिन देखभाल दिवाबत्ती हिंदू बांधव श्रद्धेने करत आहेत.
पिरचंदसाहेबांचा संदल कार्यक्रम नुकताच झाला असून संदल मिरवणुकीचा मान परिसरात राहणाऱ्या मुस्लीम बांधवाना सन्मानपूर्वक निमंत्रण देऊन साजरा करण्याची १०० वर्षाची परंपरा आहे. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्य पहावयास मिळते.
मुक्ताबाई देवीचा अभिषेक, पूजा, चोळी-पातळ व त्यानंतर पिरचंदसाहेब संदल मिरवणुकीचे सवाद्य आयोजन केले जाते. मिरवणुकीच्या अग्रभागी उद्योजक किसनराव उंडे, प्रभाकर उंडे, सरपंच गोपाळ गवारी, यात्रा समितीचे अध्यक्ष नितीन आगळे, ज्ञानेश्वर उंडे, तबाजी उंडे, दिनकर आदक, विलासराव उंडे, मुरलीधर थिटे,अनिल गवारी, संदीप आदक, होते.
गेली अनेक वर्ष निमगाव सावा, मंगरूळ पारगाव, बेल्हे आदी आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या मुस्लीम बांधवाना संदल उत्सव साजरा करण्यासाठी निमंत्रित करण्याची परंपरा आहे. पिरमहंमद मोमिन, सादिक मोमीन, पर्वेश मोमीन, लालु मोमिन, शोयद इनामदार यांनी गोड भात तयार करून संदल मिरवणुकीची व्यवस्था पहिली.
आकर्षक रोषणाई, शोभेचे दारूकाम, फटाक्याच्या आतषबाजी, लेझीम- ढोल पथक मिरवणुकीत होते. मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम, किसनराव उंडे व आदर्श गाव गावडेवाडी चे ऋषिकेश गावडे यांच्या हस्ते कृषी भूषण पुरस्कार विजेते बाळासाहेब गवारी,
उच्च शिक्षित एमएड शिक्षक संघ कृती समितीच्या राज्य अध्यक्षपदी राजू सावकार जाधव (सर), उपसरपंच लता विलास उंडे यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुणे जिल्हा महिला सरचिटणीसपदी निवड, स्वच्छता कामगार आदिनाथ शिंदे यांचा व मुस्लिम बांधवांचा सन्मान करण्यात आला.
“येथील गावकर्यांनी राज्यशासनाच्या आदर्शगाव योजनेअंतर्गत आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शगाव राळेगण सिद्धी, आदर्शगाव हिवरे बाजार याप्रमाणेच आदर्शगाव भागडी गावाचा कायापालट ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या माध्यमातून केला आहे.
हे गाव पाणीदार झाले माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व भीमाशंकर कारखान्याने ही गावाला वेळोवेळी मदत व सहकार्य केले आहे.येथील हिंदू-मुस्लीम ऐक्य अन्य गावांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे आहे.”असे देवदत्त निकम यांनी सांगितले.