हिंजवडी ते चाकण मेट्रो करा - काटे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

पिंपरी - नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गाऐवजी हिंजवडी ते चाकण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा. हा मार्ग पिंपळे सौदागर, कस्पटे वस्ती, वाकड या भागातून नेण्याचा ठराव स्थायी समितीमध्ये प्रशासनाने मंजूर करून घ्यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आज महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी (ता.१८) झालेल्या सभेत नाशिक फाटा ते चाकण मार्गावर मेट्रो धावण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे; परंतु हा मार्ग शहरातील नागरिकांना सोयीचा ठरणार नाही. विशेषतः पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड, हिंजवडी या भागातील नागरिकांसाठी नाशिक फाटा ते चाकण हा मेट्रो मार्ग गैरसोयीचा ठरणार आहे. चाकणपर्यंत करण्यात येणारा मेट्रोमार्ग हिंजवडीपासून सुरवात झाल्यास शहराच्या निम्म्याहून अधिक भागातील नागरिकांना त्याचा सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठा फायदा होईल.

पिंपळे सौदागर परिसर सर्वाधिक वेगाने वाढणारा आहे. या भागात सर्व क्षेत्रातील सधन नागरिकांसोबतच विविध ठिकाणी कामे करणारा मध्यम वर्गही राहतो. विशेषतः हिंजवडीतील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारा अभियंता वर्ग पिंपळे सौदागर, पिंपळे निलख आणि वाकडसारख्या भागात लाखोंच्या संख्येने वास्तव्याला आहे. त्यामुळे या लाखो लोकांना हिंजवडी किंवा चाकण परिसरात जाण्यासाठी मेट्रो सोयीची ठरेल; परंतु महापालिकेने केवळ नाशिक फाटा ते चाकण हा अर्धवट मेट्रो मार्ग तयार केल्यास त्याचा नागरिकांनाही उपयोग होणार नाही आणि मेट्रोलाही फायदा होणार नाही, असेही काटे यांनी निदर्शनास आणून दिले.

Web Title: hinjawadi to chakan metro demand shatrughn kate