पुणे : हिंजवडी आयटी पार्कसाठी बांधलेल्या नव्या पुलाला‌ भेगा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

- महामार्गावर वाकड येथील मुळानदीवर बांधलेल्या पुलाला तडे 
- चार महिन्याच्या आत पुल बंद करण्याची सरकारवर नामुष्की...

हिंजवडी (पुणे) ः वाकड येथे अवघ्या चार-पाच महिन्यांपूर्वी नव्याने बांधलेल्या मुंबई-बंगळूरु महामार्गावरील मुळा नदीवरील पुलाला तडे गेल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंचा भरावही खचल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वीच अगदी घाईघाईत या पुलाचे उदघाटन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यानंतर हा पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. या पुलामुळे महामार्गावर नित्याने होणारी वाहूतककोंडी देखील कमी झाली होती.

निकृष्ठ दर्जाचे काम असल्याने पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्या आहेत. तर म्हाळुंगेच्या बाजूने पुलाचा भराव खचला असून पुल कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निकृष्ठ व दर्जाहिन कामामुळे रस्ते विकास महामंडळाचे कोट्यावधी रूपये पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडूनच समांतर पुल उभारून घ्यावा अशी मागणी युवा लघुउद्योजक राम वाकडकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

महामार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी तसेच बाणेर, पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे येणाऱ्या वाहनांना आय़टी पार्ककडे सुरळीतपणे जाण्यासाठी हा पुल बांधण्यात आला होता. सुमारे दीड वर्षे या पुलाचे काम सूरू होते. आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या हिंजवडीमध्ये दररोज लाखो आयटीयन्स कामाच्या निमीत्ताने हिंजवडीला ये-जा करत असतात.

महामार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्यांची संख्या लक्षणिय असल्याने महामार्गावरील जुन्या पुलालगत समांतर नवा पुल बांधण्यात आला. या पुलामुळे लाखों आयटीयन्स ना थेट हिंजवडीकडे येता येत होते. आता हा पुल बंद झाल्याने वाकड येथे महामार्गावर होणारी वाहतूककोंडी पु्न्हा उग्र रूप धारण करणार अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या. पुलाला भेगा पडल्याची माहिती सोशल मि़डीयातून प्रसारित होताच या ठिकाणी बघ्यांनी एकच गर्दी केली. यावेळी नागरिकांना बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याकरिता वाहूतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

पुलाला तडे गेल्याने पुलावरील व पर्यायाने महामार्गाच्या सर्व्हीस रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून अऩेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hinjewadi IT Park new bridge have been broken in pune