हिंजवडी मेट्रोचे काम ऑगस्टमध्ये

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, या महिनाअखेर प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या मेट्रो प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, या महिनाअखेर प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या मेट्रो प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

प्राधिकरणाने हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला डिसेंबर २०१६ ला मान्यता दिली होती. २ जानेवारी २०१८ रोजी राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर पीएमआरडीएकडून खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) हा प्रकल्प राबविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार तीन कंपन्यांनी निविदा भरल्या. निविदांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या महिनाअखेरपर्यंत जी कंपनी पात्र ठरेल, त्या कंपनीला हे काम देण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.

 ते म्हणाले, ‘‘हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या २३.३ किलोमीटरच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून तेराशे कोटी रुपयांचे व्यवहार्यता तफावत निधीसाठी अनुदान मंजूर झाले आहे. मेट्रोच्या कामाचा खर्च आठ हजार कोटी असून ४० टक्के निधी केंद्र-राज्य सरकार व पीएमआरडीएकडून, तर उर्वरित ६० टक्के निधी खासगी कंपनीच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. मेट्रोच्या कामासाठी टाटा रिॲलिटी सिमेन्स, आयएल- एफएस आणि आयआरबी या खासगी कंपन्या निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीदेखील या कंपनीचीच असणार आहे. खासगी कंपन्यांनी सादर केलेल्या आर्थिक आराखड्याची तपासणी करूनच अंतिम एका कंपनीसोबत करार केला जाणार आहे. हा करार ३५ वर्षांसाठी असणार आहे.’’

मेट्रो मार्गात छोटासा बदल
पीएमआरडीएकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात बालेवाडीच्या ठिकाणी छोटासा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे २०० मीटरने मार्गाची लांबी कमी झाली आहे, असे सांगून गित्ते म्हणाले, ‘‘या मार्गाचा शिवाजीनगर ते हडपसर दरम्यान विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दिल्ली मेट्रोला या मार्गाचा सर्वंकष अहवाल तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या विस्तारित मार्गाची स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे.’’

Web Title: Hinjewadi Metro work start in august