हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पुणे -  पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची मोहोर उमटली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पुणे -  पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची मोहोर उमटली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पुणे महानगराचा गतीने विकास होण्यासाठी राज्य शासनाने पीएमआरडीएची स्थापना केली. स्थापनेनंतर प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले. हिंजवडी येथे आयटी क्षेत्रातील अनेक नामवंत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटी कंपन्या कार्यरत आहेत. या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी सुमारे दोन लाख नागरिक येत असतात. अपुऱ्या रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. पीएमआरडीएने याविषयी आयटी कंपन्या व वाहतूक विभाग यांच्यासोबत बैठका घेऊन हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. 

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाने पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गास आणि स्थानकांना मान्यता दिली आहे. याविषयीचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकल्पास राज्य शासनाने १८ जुलै २०१८ रोजी महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. त्यानंतर केंद्र शासनाकडून मेट्रोच्या मार्गास व स्थानकांना मान्यता मिळाली आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सार्वजनिक भागीदारी तत्वावर (पीपीपी मॉडेल) या प्रकल्पाचे काम करण्यास टाटा सिमेन्स ही कंपनी पात्र ठरली आहे. लवकरच पीएमआरडीए व टाटा सिमेन्स यांच्यामध्ये करारनाम्यावर स्वाक्षऱ्या होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

येथे असणार स्थानके 
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गासाठी माण येथे कारशेड असणार आहे. माण, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी, बाणेर गाव, बाणेर, कृषी अनुसंधान परिषद, यशदा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, आरबीआय बॅंक, कृषी महाविद्यालय आणि शिवाजीनगर न्यायालय या ठिकाणी मेट्रोची स्थानके असणार आहेत.

Web Title: Hinjewadi-Shivajinagar metro center government approved