हिंजवडीत वाहतुकीचा खेळखंडोबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

आयटी पार्कला जोडणाऱ्या पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी असोसिएशनकडून सातत्याने पाठपुरवठा सुरू आहे. मात्र, हे काम मार्गी लागत नसल्याने भविष्यात येथील वाहतूक समस्येत भर पडेल. त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालून हे काम तत्काळ पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे.
- कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन 

पिंपरी - पर्यायी रस्त्याची अपूर्ण असणारी कामे तसेच सुरू झालेले हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम, यामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक समस्येत भर पडणार आहे. अनेक दिवसांपासून या ठिकाणी सुरू असणाऱ्या पर्यायी रस्त्यांच्या कामाबरोबरच अन्य प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जुलैअखेरीस बैठक घेण्यात येणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये होणाऱ्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा परिषद, पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबरच हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. सध्या आयटी पार्कमध्ये जाण्यासाठी शिवाजी चौक आणि भूमकर चौकाकडून येणारा रस्ता उपलब्ध आहे. गेल्या वर्षी हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या पर्यायी रस्ताचे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिले होते. मात्र, हे काम पूर्ण झाले नाही. त्यात पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोच्या कामाला आयटी पार्कमधील फेज तीनपासून सुरवात केली.

मेट्रोच्या कामाचा वेग वाढल्यावर फेज तीनमधून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरील कोंडीत भर पडेल. आयटी पार्कमध्ये पिरंगुटकडून घोटावड्यामार्गे येणाऱ्या रस्त्याचे काम झाले नाही. चांदे नांदेकडून येणाऱ्या रस्त्यापैकी अर्ध्या रस्त्याचे कामच पूर्ण झाले आहे. बालेवाडीकडून नांदेकडे येणारा रस्ताही अपूर्ण आहे. याशिवाय भूमकर चौक, वाकड चौक येथील रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे आयटी पार्कमध्ये येणाऱ्या मंडळींना शिवाजी चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. मेट्रोच्या कामाचा वेग वाढल्यानंतर या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढणार आहे.

दरम्यान, आयटी पार्कमधील पर्यायी रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने ‘आयटीयन्स’ना अनेक वर्षांपासून त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेक बैठका झाल्या. मात्र, ज्या वेगाने हे काम होणे अपेक्षित होते, तसे झालेले नाही. त्यामुळे पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरच हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला सुरवात करावी. अन्यथा, येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न अधिक जटिल होईल, असे मत मनोज कलमाडे या संगणक अभियंत्याने व्यक्‍त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hinjewadi Traffic Issue