शहराचा इतिहास, सांस्कृतिक वारसा उलगडला चित्रमालिकेतून

शहराचा इतिहास, सांस्कृतिक वारसा उलगडला चित्रमालिकेतून

पिंपरी : शहराचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आता म्युरल्सच्या माध्यमातून उलगडला आहे. मुंबई येथील चित्रकारांनी त्यांच्या कुंचल्यातून इनॅमल पेंटमध्ये चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भिंतीवर लक्षवेधक चित्रमालिका साकारली आहे. त्या माध्यमातून नाट्यगृहाला भेट देणाऱ्या रसिकांना एक अनोखा चित्र नजराणा पाहण्यास मिळत आहे. 

प्रा. मोरे प्रेक्षागृह रविवारपासून खुले झाले आहे. नाट्यगृहाच्या भिंतीवर भक्ती-शक्ती समूह शिल्प, क्रांतिवीर चापेकर स्मारक, महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिर, संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी, क्रांतिवीर चापेकर बंधू ही शहराचा ऐतिहासिक वारसा दर्शविणारी चित्रे चितारली आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पार्श्‍वगायिका आशा भोसले, साहित्यिक पु.ल.देशपांडे, प्र.के.अत्रे तसेच युवा गायक महेश काळे, नाट्य कलाकार प्रशांत दामले आदींची चित्रे लक्ष वेधून घेतात. त्याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिका इमारत, मेट्रो यांची चित्रे देखील येथे नजरेस पडतात. त्याशिवाय, लावणी नृत्य व विविध सांस्कृतिक विषयांवरील चित्रे लक्षवेधक आहेत. 

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सूचनेनुसार मुंबई येथील 9 चित्रकारांनी ही चित्रे काढली आहेत. गेल्या आठवडाभरात हे काम पूर्ण करण्यात आले. प्रसिद्ध चित्रकार सुनील शेगावकर यांच्या संकल्पनेतून ही चित्रमालिका साकारली आहे. प्रवीण गांगुर्डे, प्रभाकर कांबळे, महेश सौदत्ते, मोहसीन मटवाल, उत्तम जनवाडे, भार्गव कुलकर्णी, तौसिफ मटवाल, मिलिंद भागवत, उमेश फुटाणे या चित्रकारांनी ही कलाकृती साकारली आहे. 

नाट्यगृहाच्या अंतर्गत सजावटीसाठी नाटक या विषयावर "वाडा चिरेबंदी' या नाटकातील एक हुबेहूब प्रसंग चित्राच्या माध्यमातून शेगावकर यांनी भिंतीवर साकारला आहे. आठ बाय पाच फूट आकाराचे हे चित्र आहे. त्याशिवाय, लोककला, आधुनिकीकरण आणि शास्त्रीय संगीत अशा तीन विषयांवर आधारित चित्रे ते काढणार आहेत. भिंतीवरील चित्रमालिकेसाठी सह-शहर अभियंता प्रवीण तुपे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com