वारसा स्थळांचा इतिहास उलगडणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

पुणे : महापालिकेतर्फे शहराच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असणाऱ्या आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या इमारतींच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक कलादालन येथे भरविण्यात येणार आहे. फेब्रुवारीमध्ये हे कलादालन रसिकांसाठी खुले होणार आहे.

याबाबत हेरिटेज सेलचे श्‍याम ढवळे म्हणाले, ""महापालिकेतर्फे सांस्कृतिक वारसा स्थळांच्या जतनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या इमारती, तसेच महत्त्वाच्या इमारतींचे छोटे मॉडेल बनवून ते या कलादालनात ठेवण्यात येणार आहे. पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असणाऱ्या शहरातील या वास्तू नागरिकांना एकाच ठिकाणी पाहायला मिळणार असल्यामुळे या वास्तूंचे महत्त्व वाढण्यास मदत होईल.''

या इमारतींच्या प्रतिकृती बनविण्याचे काम कलाकार अनिरुद्ध देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी केले आहे. एक प्रतिकृती बनविण्यासाठी सुमारे सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. कला आणि संस्कृती यांचा उत्कृष्ट मिलाफ असणाऱ्या वास्तूंचे हे प्रदर्शन नागरिकांच्या पसंतीस नक्‍कीच उतरेल, असेही त्यांनी सांगितले.

या इमारतींचा समावेश
प्रदर्शनामध्ये नाना वाडा, गोखले स्मारक, गोखले हॉल, नगर वाचन मंदिर, नागेश्‍वर मंदिर, ओंकारेश्‍वर मंदिर, प्रार्थना समाज, क्रिस्पिअन चर्च, कौन्सिल हॉल या वास्तूंच्या प्रतिकृती आहेत. त्याचबरोबर डेक्कन महाविद्यालय, शिंदे छत्री, कसबा गणपती मंदिर, जयकर बंगला या इमारतींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

Web Title: history of heritage places in pune