सोसायटीच्या सुरक्षेसाठी हायटेक तंत्रज्ञान

रवींद्र जगधने 
मंगळवार, 24 एप्रिल 2018

बदलणारे तंत्रज्ञान मोबाईलमुळे हातात मिळत असल्याने दैनंदिन गरजांमध्ये त्याचा प्रभावी वापर होताना दिसतो. त्याचेच उदाहरण रॉयल कॅसल सोसायटी आहे.

पिंपरी (पुणे) - अनुचित घटना व चोऱ्या टाळण्यासाठी थेरगाव येथील रॉयल कॅसल सोसायटी विविध कामानिमित्त, पार्सल देण्यासाठी किंवा भेटायला येणाऱ्यांची अचूक माहिती व डाटा ठेवण्यासाठी मोबाईल ऍपचा वापर करत आहे. या हायटेक तंत्रज्ञानामुळे प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे नोंद करण्यात जाणारा वेळ, वादावादीचे प्रसंग टाळण्यात मदत होत आहे. 

बदलणारे तंत्रज्ञान मोबाईलमुळे हातात मिळत असल्याने दैनंदिन गरजांमध्ये त्याचा प्रभावी वापर होताना दिसतो. त्याचेच उदाहरण रॉयल कॅसल सोसायटी आहे. सोसायटीत ये-जा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अचूक माहिती ठेवण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर होत आहे. हे अॅप सोसायटीतील रहिवासी, कामाला येणाऱ्या महिला, ड्रायव्हर, तांत्रिक व विविध वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी सोईचे ठरत आहे. प्रवेशद्वारावरील नोंदवहीत येणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी बराच वेळ जातो. मात्र, अॅपवर नोंदणीसाठी अवघे तीस सेकंद ते एक मिनीट वेळ पुरेसा आहे. असे सुरक्षारक्षक किरण पांडे यांचे म्हणणे आहे. 

अॅपचा असा होतो वापर - 
सोसायटीत 192 सदनिकाधारकांनी अॅपवर नोंदणी केली असून या अॅपचे डिवाईस सुरक्षारक्षकांकडे दिलेले आहे. सोसायटीत बाहेरून येणाऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक, वाहन क्रमांक व फोटोची नोंदणी सुरक्षारक्षकांकडील अॅपमध्ये होते. त्यानंतर संबंधित सदनिकेचा क्रमांक टाकून कामाचे कारण नोंदविल्यानंतर संबंधित सदनिकाधारकाला संदेश किंवा फोन अॅपवरूनच जातो. सदनिकाधारकाने होकार दिल्यास सुरक्षारक्षक आत सोडतो अन्यथा सोडत नाही. सोसायटीत काम करणाऱ्या बाईंना 'पिन नंबर' दिलेला आहे. प्रवेशद्वारावर पिन नंबर सांगितल्यास त्या बाईंचे नाव, पत्ता व काम करणाऱ्या सदनिकेचा क्रमांक दाखवला जातो. तर पाहुण्यांसाठी सदनिकाधारक अगोदरच मोबाईलवर पिन नंबर पाठवतात. तो पिन नंबर प्रवेशद्वारावर सांगितल्यास पाहुण्यांची अॅपवर नोंदणी केलेली माहिती उघड झाल्यास सुरक्षारक्षक प्रवेश देतात. 

अगोदर आम्हाला विविध लोकांच्या व कामाला येणाऱ्या बाई यांच्या नोंदी ठेवणे अवघड होते. तर काही लोक चुकीची नावे, मोबाईल नंबर देत किंवा काही देतच नसत. त्यामुळे हे सुरक्षेच्या दृष्टीने हे धोकादायक होते. मात्र, आता अॅपमुळे डाटा साठवला जात आहे. तसेच पोलिसांना त्याची आवश्‍यकता पडल्यास देणेही सोपे आहे. 
- रवी आव्हाड, सचिव, रॉयल कॅसल सोसायटी

सोसायटीत येणारे काही वेळेस वाहने अस्तावेस्थ लावतात. त्यावेळी ही गाडी कोणाची आहे आणि हा व्यक्ती कोणाकडे गेला आहे, याची माहिती अॅपमुळे मिळते. तसेच सोसायटीतील मुले बाहेर जात असल्याची माहिती सुरक्षारक्षक अॅपवरून देतो. प्रवेशद्वारावर एखादे पार्सल घेतल्यास त्याचा तत्काळ फोटो काढून संबंधिताला पाठवला जातो. 
- स्वप्नील वाणी, अध्यक्ष, रॉयल कॅसल सोसायटी

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Hitech technology for the protection of society