Video : विमानांच्या प्रतिकृती तयार करण्याचा छंद

Prashant-Pujari
Prashant-Pujari

भारतीय वायू सेना दलात वापरल्या गेलेल्या व इतरही काही विमानांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार करण्याचा छंद प्रशांत पुजारी यांनी जोपासला आहे. मिग २१, मिग २९, एफ १६, एफ २०, जग्वार, मिराज २०००, सुखोई आदी विमानांच्या साठहून अधिक कागदी प्रतिकृती त्यांनी तयार केल्या आहेत. 

नव्याने येऊ घातलेल्या राफेल विमानाची प्रतिकृती तयार करण्यात पुजारी सध्या गढले आहेत. उडणारी मॉडेल्स बनवण्यातही ते निष्णात आहेत. विमानांची ‘एरो मॉडेल्स’ म्हणजे प्रतिकृती आणि त्याही कागदापासून तयार करणं ही एक अत्यंत अवघड कला आहे. मूळ विमानाच्या एकेका घटकाच्या मापानुसार प्रतिकृतीत तो-तो घटक लघुरूपात बनवणं, त्यातील अचूकता व सुबकपणा राखणं या वैशिष्ट्यांसह प्रशांत पुजारी यांनी चार दशकांमध्ये साठपेक्षा जास्त एरो मॉडेल्स बनवली आहेत. ते म्हणाले, ‘‘भारतीय वायू सेना दलात वापरल्या गेलेल्या विमानांच्या प्रतिकृती बनवल्यानंतर त्यांपैकी काही मी संबंधित अधिकाऱ्यांना दाखवल्या. त्यांना त्या पसंत पडल्या. भारतातील पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या भेटीचा एकदा योग आला. मिग २१ या विमानाची प्रतिकृती मी सोबत नेली. त्या अनुषंगाने आमच्या भरपूर गप्पा झाल्या, ही आठवण माझ्या आयुष्यातील मोलाचा ठेवा आहे.’

पुजारी यांनी असंही सांगितलं की, निरनिराळ्या प्रकारच्या विमानांच्या प्रतिकृती बनवतो, ते क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचे असतात. जे. के. कार्डशीट व इंडियन आयव्हरी पेपर मी यासाठी वापरतो. काम पूर्ण झाल्यावर ऑइल पेंटमुळे प्रतिकृती दिमाखदार दिसते. इयत्ता सातवी-आठवीत असताना एका नियतकालिकात विमानांची अप्रतिम छायाचित्रं पाहिल्यावर, आपण थ्रीडी प्रतिकृती बनवून पाहू, असं उत्कटतेनं वाटलं. सुरवातीला दोन-तीन प्रतिकृती म्हणाव्या तेवढ्या उत्तम झाल्या नाहीत. पण धीर धरून मी प्रयत्न करत राहिलो आणि हात बसला. मग मी अनेक प्रकारच्या विमानांच्या प्रतिकृती बनवल्या. 

भाऊ, बहीण, मित्रमंडळींना भेट देण्यासाठी काही तयार केल्या. मी आर्किटेक्‍ट असल्याने डिझाइनचं ड्रॉइंग तंतोतंत करण्याचा सराव या कलेसाठी मला उपयोगी पडतो. मी उडू शकणारी छोटी विमानंही बनवतो. त्यात इंजिन असतं. रिमोटच्या साहाय्याने ते उडवतो. आपल्याकडे नव्याने येऊ घातलेल्या राफेलची प्रतिकृती बनवण्यासाठी सध्या माझा अभ्यास चाललेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com