प्रदूषण टाळा अन्‌ प्रेमाचे तरंग फुलवा!

Colour
Colour

होळी म्हणजे रंगांची उधळण. मग हे रंग चेहरे रंगवणारे नव्हे तर, दुसऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे आणि प्रेमाचे तरंग फुलवणारे आहेत. कृत्रिम रंगांचा वापर करून प्रदूषण न करता नैसर्गिक रंगांचा वापर करून दुसऱ्यांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम करा, असा संदेश छोट्या पडद्यावरील कलाकारांनी दिला आहे.

पूर्वा गोखले (तुझसे है राबता) - मी दरवर्षी होळीला माझ्या आईवडिलांच्या घरी जाते आणि तिथे आमचे सर्व नातेवाईक एकत्र जमतात. आम्ही तेव्हा नैसर्गिक आणि कोरडे रंग वापरतो. दुसऱ्या कोणालाही त्रास होणार नाही आणि हानी पोचणार नाही, अशा पद्धतीने होळीचा सण साजरा  करतो.

रूपाली भोसले - होळी सणाचा मुख्य उद्देशच आपण विसरतोय. आपण या सणाला हजारो लिटर पाणी आणि रंगांचा अपव्यय करतो. यंदा आम्ही कलाकार नैसर्गिक होळी साजरी करणार आहोत. ज्यात कोणाचे आर्थिक किंवा शारीरिक नुकसान होणार नाही. तसेच, प्रदूषणातही भर पडणार नाही.

भार्गवी चिरमुले (मोलकरीण बाई) - माझी नवी मालिका ‘मोलकरीण बाई’ लवकरच स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. या मालिकेत आम्ही धुळवडीचा खास सिक्वेन्स शूट केलाय. यानिमित्ताने बऱ्याच वर्षांनी मी रंग खेळले. पर्यावरणाची हानी होणार नाही आणि मुक्‍या प्राण्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेत सण साजरे करावेत.

अमृता पवार (ललित २०५) -  मी मूळची कोकणातली. त्यामुळे दरवर्षी कोकणातल्या शिमगोत्सवाला आवर्जून जायचे. यंदा चित्रीकरणामुळे जाणं होणार नाही. पारंपरिक पद्धतीने बांधली जाणारी होळी, त्यानिमित्ताने नातेवाईकांच्या होणाऱ्या भेटीगाठी आणि खास म्हणजे कोकणात घरोघरी येणारी देवाची पालखी हा माहोल भारावून टाकणारा असतो. यंदा ‘ललित’च्या सेटवर धुळवड मी एन्जॉय केलीय.

परेश गणात्रा (बाकरवडी) - माझ्यासाठी होळी म्हणजे पूर्ण सुट्टी. मी या उत्सवासाठी पाणी वाया घालवत नाही. लोक ज्याप्रकारे होळी खेळतात, त्यात या उत्सवाची खरी आत्मीयता नसते. मी लहानपणापासून अगदी २० वर्षांचा होईपर्यंत होळी खेळलो. नंतर मात्र मला अशाप्रकारे होळी खेळण्याचे हानिकारक प्रभाव समजले. मी आता गुलालाचा टिळा लावून माझ्या मित्रांसोबत होळी साजरी करतो.

पारस अरोरा (बावले उतावले) - माझ्यासाठी होळी म्हणजे असा उत्सव आहे, ज्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद पसरतो. लहानपणी मी होलिका दहनासाठी चार वाजता उठायचो. आता मात्र आम्ही होळीला फारच कमी रंग खेळतो, कारण हल्ली त्यात अनेक घातक रासायनिक घटक असतात. मी सर्वांना आनंदी, रंगमय आणि सुरक्षित होळीच्या शुभेच्छा देतो. 

एरिका फर्नांडिस (कसौटी जिंदगी की) - होळी हा माझा आवडता उत्सव आहे. हा एक आनंददायक सण आहे जो मी सहसा मित्र आणि कुटुंबासह साजरा करतो. हा उत्सव प्रियजनांना एकत्र आणतो. त्यामुळे या सणाचा आनंद नैसर्गिक रंगांची उधळण करूनच घ्या. त्यामुळे कोणालाही हानी पोचणार नाही.

श्रेणू पारिख (एक भ्रम- सर्वगुणसंपन्न) - होळी माझ्यासाठी महत्त्वाची असून काहीही झालं तरी हा सण मी कधीही चुकवत नाही. माझा परिवार वडोदरा येथे राहतो, त्यामुळे होळीच्या वेळेस जरी चित्रीकरणामुळे मी तिथे जाऊ शकले नाही तरी मी सेटवर किंवा मुंबईमधील माझ्या घरी हा सण साजरा करते. मला रंग खेळायलाही आवडतात. त्यामुळे सर्वांनीच पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा.

समृद्धी केळकर (लक्ष्मी सदैव मंगलम्‌) - यंदा तब्बल सहा वर्षांनी मी रंगपंचमी खेळली ते पण मालिकेच्या सेटवर. त्यामुळे ही रंगपंचमी माझ्यासाठी खूप खास आहे. पण मी यानिमित्ताने एक संदेश देईन पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे पाणी जरा जपून वापरा आणि नैसर्गिक रंगाचाच वापर करा.

भाग्यश्री लिमये (घाडगे ॲण्ड सून) - होळीच्या दिवशी आपल्या आजूबाजूला ज्या वाईट गोष्टी घडत आहेत त्यांचा नाश होवो आणि ही होळी व रंगपंचमी सगळ्यांसाठी आनंददायी जावो. रंगपंचमीच्या दिवशी कृपया मुक्‍या प्राण्यांना त्रास होईल असे काही करू नका, त्यांना रंगापासून दूर ठेवा.

वृशिका मेहता (ये तेरी गलियाँ) - आम्ही अहमदाबादमध्येही सर्व कुटुंबीय एकत्र जमून रंग खेळतो. त्या दिवसाच्या वातावरणात इतका उत्साह आणि धमाल भरलेली असते की कोणाची तरी खोडी काढल्याशिवाय राहताच येत नाही. आम्ही मालिकेच्या सेटवरच नैसर्गिक रंगांची उधळण करत होळी साजरी करणार आहोत. 

रेहना पंडित (मनमोहिनी) - यंदा माझे मित्र आणि कुटुंबीयांसमवेत मी मुंबईत होळी साजरी करणार आहे. यंदा आम्ही बॉलीवूडवर आधारित एका थीम पार्टीचं आयोजन केलं असून, त्या वेळी आम्ही भरपूर खाद्यपदार्थ ठेवणार असून रंग खेळणार आहोत. आम्ही नैसर्गिक रंग वापरून आणि पाण्याचा कमीत कमी वापर करणार आहोत. 

आएशा सिंह (इश्‍क सुभान अल्ला) - आनंद आणि धमालमस्ती यांचा संगम असलेला होळी हा सण माझा सर्वांत आवडता आहे. मला आठवतंय, मी लहान असताना आमच्या घरचे आणि आजूबाजूचे लोक आदल्या रात्री होलिका पेटवून देत आणि त्यासोबत आम्ही आमच्यातील सर्व वाईट भावनाही जाळून टाकीत असू. 

संजय गगनाणी (कुंडली भाग्य) - होळीच्या दिवशी मी होलिकादेवीची पूजा करतो आणि दुसऱ्या दिवशी मित्रमंडळींबरोबर रंग खेळतो. नैसर्गिक रंग हा एक खरंच चांगला शोध असून ते लगेच अंगावरून निघतात आणि तुम्हाला कोणतीही इजा करीत नाहीत. माझ्यासारख्या अभिनेत्यांना हे रंग म्हणजे एक वरदानच आहे; कारण रंगाचे कोणते दुष्परिणाम होतील, याची चिंता न करता आम्हाला रंग खेळता येतात. 

कनिका मान (गुड्डन तुमसे ना हो पाएगा) - यंदाची होळी मी मुंबईत मित्रमैत्रिणींबरोबर खेळणार आहे. लहानपणी मी होळीच्या दिवशी भरपूर गुज्जिया आणि मालपुवा खात असे. या गोष्टी मला आजही तितक्‍याच आवडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com