भाग्यवंत वहिनीला सोन्याचा हार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

प्रभागा-प्रभागांत रंगतोय ‘होम मिनिस्टर’; महिलांना वाटल्या जाताहेत पैठणी 
पुणे - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे... हे गाणे कुठल्या चित्रपटातले आहे... या गाण्यावर नृत्य करून दाखवा... तुमच्या मुलाने आज कुठल्या रंगाचे कपडे घातले आहेत... असे सोपे-सोपे प्रश्‍न विचारून आणि व्यासपीठावर येऊन गाणी- नृत्य असे कलागुण सादर करायला लावून महिलांना ‘भाग्यवंत’ ठरवले जात आहे. इतकेच नव्हे, तर अशा भाग्यवंत महिलांना पैठणीपासून एलसीडी, फ्रिज, मिक्‍सर ते अगदी सोन्याच्या हारापर्यंतची भरघोस बक्षिसे दिली जात आहेत. हे चित्र शहरातील प्रभागा-प्रभागांमध्ये सध्या पाहायला मिळत आहे.

महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने ‘न्यू होम मिनिस्टर’, ‘खेळ मांडियेला’, ‘स्पर्धा तुमच्यातील कलागुणांची’, ‘उत्तर द्या, बक्षीस जिंका’, ‘खेळ रंगला पैठणीचा’... असे गर्दी खेचून घेणारे कार्यक्रम मतदारसंघात आयोजित केले जात आहेत. शिवसेना, भारतीय जनता पक्षच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या इच्छुकांकडूनही हे कार्यक्रम होताना दिसत आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला मतदार एकत्र आणून त्यांच्यात एकीकडे स्पर्धा घेतली जात आहे, तर दुसरीकडे त्यांच्यापर्यंत इच्छुक उमेदवाराचे नावही पोचवले जात आहे.

उपनगरांतच नव्हे, तर सदाशिव पेठ, नारायण पेठ, टिळक रस्ता, डेक्कन, कर्वे रस्ता या शहराच्या मध्यभागातही असे सांस्कृतिक कार्यक्रम सध्या रंगत आहेत आणि महिलांची तेथे तुडुंब गर्दीही होत आहे. स्पर्धेत पहिल्या आलेल्या महिलेला ३२ इंची एलईडी, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या महिलेला २७५ लिटरचा फ्रिज, तृतीय क्रमांक मिळवलेल्या महिलेला ॲटोमॅटिक वॉशिंग मशिन दिले जात आहे. 

इलेक्‍ट्रिक शेगडी आणि मिक्‍सर ज्युसर ग्राइंडर हे चौथा, पाचवा क्रमांक पटकावणाऱ्या महिलेला बक्षीस म्हणून मिळत आहे. स्पर्धेची पारितोषिके इथेच थांबत नाहीत, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या १५ भाग्यवंत महिलांना प्रत्येकी एक पैठणी दिली जाते. ती सहभागी महिलांमधून ‘लकी ड्रॉ’ पद्धतीने दिली जाते. लकी ड्रॉमधूनच एका महिलेला दुचाकी आणि सोन्याचा हारही दिला जात असल्याचे शहरात पाहायला मिळत आहे.

‘खेळ मांडियेला’ हा कार्यक्रम केवळ निवडणुकीत नाही, तर वर्षभर ठिकठिकाणी करतो, त्यानुसार पुण्यातही केला. या कार्यक्रमाची किंवा ‘होम मिनिस्टर’ची नक्कल करण्याचे प्रमाण निवडणुकीच्या निमित्ताने खूपच वाढले आहे. काल पुण्यात आलो तेव्हा शहरात सगळीकडे अशा कार्यक्रमांचे फलक दिसले. अशा कार्यक्रमांमधून महिलांना एकत्र आणले जात आहे. विशेष म्हणजे यात सर्वच पक्षांचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
- आदेश बांदेकर, अभिनेता

Web Title: home minister competition