पुणे, पिंपरी चिंचवड परिसरासह आता 'या' भागात दहा जण "होम क्वारंटाइन' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

आळंदी परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या जवळपास दहा जणांना "होम क्वारंटाइन'मध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

आळंदी - पुणे, पिंपरी चिंचवड परिसरासह आता कोरोनाचा संसर्ग लगतच्या भागांमध्येही होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आळंदी आणि वडमुखवाडी परिसरात दहा जणांना "होम क्वारंटाइन' केल्याची माहिती पुढे आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यापासून जवळ असल्याने प्रशासनाने आळंदीसह खेडे तालुक्‍यातील गावांवर विशेष लक्ष दिले आहे. चऱ्होली, वडमुखवाडी हा परिसर पिंपरी महापालिकेच्या हद्दीत असल्याने आरोग्य विभाग संशयित रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. आळंदी परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या जवळपास तेरा जणांना "होम क्वारंटाइन'मध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा : पुणे विद्यापीठातील केंद्राला 'नॅशनल रिसोर्स सेंटर'चे नामांकन

"होम क्वारंटाईन'मुळे बाकीचे नागरिक सतर्क झाले आहेत. प्रशासन संचारबंदी आणि आरोग्याबाबत विशेष दक्षता घेताना दिसून येत आहे. आळंदी नगरपालिकेने नागरिकांचे सर्वेक्षण करण्यास सुरवात केली. यासाठी प्रभागनिहाय पथक तयार करून घरोघरी संशयित रुग्णांची माहिती घेतली जात आहे. यासाठी एक अर्जही तयार केला असून "गुगल'वर सुद्धा हा फॉर्म उपलब्ध आहे. 

नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, श्‍वसनाचा त्रास होत असेल, तर कुटुंबातील प्रत्येकाची माहिती या अर्जात भरायची आहे. यामुळे परदेशातून आलेल्या अथवा कोरोना ग्रस्त रूग्णाच्या संपर्कात आलेले नागरिकांचा शोध घेता येणे शक्‍य होणार आहे. सोसायटीमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची नोंदही सुरक्षा रक्षकांकडून ठेवली जात अूसन प्रवेशद्वारावर हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

प्रशासनाची मध्यस्थी... 
आळंदीजवळील एका खेड्यातही एक जणाला "होम क्वारंटाइन' करण्यात आले आहे. मात्र, ग्रामस्थांनी त्याला तू इथे राहू नको म्हणून गावाबाहेर जाण्याचा सल्ला दिला. मात्र, प्रशासनाने मध्यस्थी करून त्यास "क्वारंटाइन' केले. तसेच संबंधित तरुणास घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home quarantine for thirteen people in the Alandi area