गृहरचना संस्थांसाठी स्वतंत्र विभाग - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

पुणे - सहकारी गृहरचना संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार खात्यात स्वतंत्र विभाग करण्यासाठी विचार सुरू आहे. यासाठी एक अभ्यास समिती नियुक्त केली असून, महिनाभरात अहवाल सादर झाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे - सहकारी गृहरचना संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार खात्यात स्वतंत्र विभाग करण्यासाठी विचार सुरू आहे. यासाठी एक अभ्यास समिती नियुक्त केली असून, महिनाभरात अहवाल सादर झाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सहकारी गृहरचना संस्थांचे नियंत्रण सहकार खात्यात केल्यानंतर जिल्हा निबंधक, उपनिबंधक आदी यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. राज्यातील ४० ते ५० हजार सहकारी गृहरचना संस्थांची प्रकरणे, त्यांच्या निवडणुका आदीविषयीचे काम उपलब्ध मनुष्यबळाला करावे लागत आहे. या संस्थांमधील अनेक छोट्या कारणांसाठी प्रशासकीय कामातील वेळेचा अपव्यय होत आहे. या सर्व गोष्टींचा अनुभव लक्षात घेऊन, या गृहरचना संस्थांकरिता स्वतंत्र विभाग तयार करण्यासाठी राज्य सरकारने महंमद आरीफ यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, मुंबई, ठाणे, पुणे आदी मोठ्या शहरांतील लोकप्रतिनिधी याबाबत काम करीत आहेत. त्यांच्याकडूनही सूचना मागविल्या गेल्या आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

रुपी बॅंकेच्या सुनावणीच्या कामासाठी वेळ देता येत नसल्याने त्या प्रकरणांची सुनावणी करण्याची जबाबदारी सहकार सचिवांकडे सोपविण्यात आल्याचे देशमुख यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना नमूद केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी त्यांनी आकडेवारी सादर करीत, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली. 

मागील सरकारच्या काळात कर्जमाफी बॅंकांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार झाली होती. अपात्र असलेल्या १५८ कोटी रुपये दिले गेले होते. त्यापैकी १०४ कोटी रुपये वसूल केले असून, उर्वरित रक्कम वसूल केली जात आहे. कर्जमाफीत पारदर्शकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्यांनी कधी कोणाला चहा पाजला का?
राज्य सरकारच्या चहापानाच्या खर्चासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. त्याविषयी देशमुख यांनी पवार यांचे नाव न घेता, त्यांनी कधी कोणाला चहा पाजलाय का? असा खोचक प्रश्‍न केला. आपल्याकडे येणाऱ्याला चहा पाजण्याची संस्कृती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी येतात. राज्य, इतर राज्य, परदेशातील शिष्टमंडळे येतात, सर्व वर्गातील लोक त्यांच्याकडे येतात. त्यांना चहा द्यायला नको का? असे नमूद करीत चहापानाच्या खर्चावरील आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

Web Title: home structure organisation independent department subhash deshmukh