महाळुंगे पडवळमध्ये चक्क घराची चोरी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

महाळुंगे पडवळ - कुणाचे पैसे, वस्तू, कपडे व दागिने चोरीला जातात, तर चित्रपटामध्ये विहीर चोरीला गेल्याचे पाहिले असेल. मात्र, आंबेगाव तालुक्‍यातील कारेगाव येथील मारुती विठ्ठल कराळे यांच्या नावावर असलेले कौलारू घर कागदोपत्री चोरीला गेले आहे. याबाबतची लेखी तक्रार राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सहसरचिटणीस प्रदीप पडवळ (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांनी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

कारेगाव येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मारुती कराळे, सबाजी कराळे व गंगाराम कराळे या बंधूंचे वडिलोपार्जित मिळकत १३३ मध्ये ४६५ स्केअर फुटाचे कौलारू घर आहे. घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी मारुती कराळे यांच्या नावावर २००५ पर्यंत होती. तसा उतारादेखील कुटुंबांकडे आहे. कुटुंबांतील वाटपात सदर घर सबाजी कराळे यांच्याकडे आल्याने घराची नोंद करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. २००६ मध्येच ग्रामपंचायतीने मासिक सभेचा ठराव करून कराळे यांचे घर बेकायदा ‘सरपंच ग्रामपंचायत कारेगाव’ यांच्या नावावर केले आहे. कराळे यांच्याकडून ग्रामपंचायतीच्या घरपट्टीची रक्कम दरवर्षी वसूल केली जाते. घराचा उतारा मिळण्यासाठी अनेकदा अर्ज केला; परंतु उतारा ग्रामपंचायतीकडून दिला जात नाही. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात गेली तेरा वर्ष हेलपाटे मारून कंटाळलो आहे, असे सबाजी कराळे यांनी सांगितले.

कराळे कुटुंबाला कायद्याचे ज्ञान नसल्याने सदर कुटुंबांची ग्रामपंचायतीने दिशाभूल करून फसवणूक केली आहे. याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला; पण प्रशासनाने दाद दिली नाही. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे व राहुल काळभोर यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी अर्ज केला आहे. योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयाचे दरवाजेदेखील ठोठावणार असल्याचे प्रदीप पडवळ यांनी सांगितले.

घरपट्टी व अन्य कोणत्याही कराची थकबाकी नसून, वेळेवर कराची रक्कम ग्रामपंचायतीमध्ये जमा केली आहे. मग ग्रामपंचायतीने स्वतःच्या नावावर मिळकत कशी काय करून घेतली आहे, अशा प्रकारे मिळकत नावावर करण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार नाही. घराची मिळकत बेकायदेशीरपणे नावावर करून घेणे योग्य नाही. 
- मारुती कराळे, ग्रामस्थ, महाळुंगे पडवळ

Web Title: Home was stolen on paper in Mahalunge Padawal