पैसा ठरला खोटा; माणूसच खरा मोठा !

पैसा ठरला खोटा; माणूसच खरा मोठा !

प्रामाणिक रिक्षाचालक अन्‌ बातमीदारामुळे ‘तिला’ गवसली आयुष्याची पुंजी

पुणे - नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळं-पांढऱ्याचा खेळ सुरू झाला. माणूस, माणुसकीपेक्षा पैसा मोठा झाला खरा पण, एका ज्येष्ठ रिक्षावाल्या काकांनी प्रवाशी महिलेचं रिक्षात विसरलेलं पाच तोळे सोनं आहे तसं परत करून पैशांपेक्षा माणुसकी मोठी... विश्‍वास आणि प्रामाणिकपणाही मोठा हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. यामध्ये ‘सकाळ’च्या बातमीदारांनीही कौतुकास्पद भूमिका बजावली. म्हणूनच रिक्षावाला काकांचा प्रामाणिकपणा आणि बातमीदारांच्या प्रयत्नांना ‘खाकी’ वर्दीनं सलाम ठोकला.

दत्तू विठ्ठल जाधव.. कपडे निर्मितीची कंपनी बंद पडल्यामुळे पडेल ते काम करण्याची वेळ आली अन्‌ रिक्षा चालविण्याचे काम त्यांनी स्वीकारले. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ ते रिक्षा चालवित आहेत. खरंतर भाडे नाकारणे, जादा पैसे मागण्याच्या तक्रारी काही नागरिक करीत असतात. परंतु, रिक्षाचालकांची प्रतिमा उंचावण्याचे काम त्यांनी साध्या कृतीतून करून दाखविले. डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, हातात पिशवी घेऊन ते ‘सकाळ’ कार्यालयात आले. ‘‘माझ्या रिक्षात महिला प्रवाशाची पिशवी विसरली आहे. आपल्या पेपरमध्ये अशा घटनांबाबत मी खूपदा वाचले आहे. माझा ‘सकाळ’वर विश्‍वास आहे. त्यामुळे मी इथं आलोय.’’ 

ते म्हणाले, ‘‘वडगाव शेरी येथील रिक्षा थांब्यावर रविवारी सकाळी नऊच्या सुमारास उभा होतो. तीन प्रवासी महिला त्यांच्या रिक्षात बसल्या. त्यांना मुंढवा रेल्वे स्थानकाजवळ सोडले. त्यानंतर दुसरे भाडे घेऊन वेस्टीन हॉटेलजवळ गेलो. त्या प्रवाशांना सोडल्यानंतर रिक्षात सीटच्या मागे एक पिशवी दिसली. ती पाहिल्यावर पिशवी कदाचित त्या महिलेचीच असावी, असे वाटले. गॅसकिट दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मला काल येता आले नाही. ही पिशवी कोणाची आहे, हे तुम्ही शोधता का?’’ असा प्रश्‍न जाधव यांनी केला.

त्या पिशवीमध्ये मंगळसूत्र, सोन्याचे गंठण, लक्ष्मीहार आणि कर्णफुले असे सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने होते; परंतु संपर्काचे काहीच माध्यम नव्हते. त्यामुळे ही पिशवी नेमकी कोणाची, हे समजत नव्हते. त्यामध्ये मेडिकलच्या दुकानाची चिठ्ठी आढळली. त्यावर महिलेचे नाव, डॉक्‍टरचे नाव आणि मेडिकल दुकानाचा मोबाईल क्रमांक होता. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने मेडिकल दुकानात संबंधित डॉक्‍टरचा मोबाईल क्रमांक विचारला; परंतु त्यांच्याकडे तो न मिळाल्याने इंटरनेटवरून क्रमांक मिळविला. डॉक्‍टरसोबत चर्चा केली असता ती महिला चंदननगर खुळेवाडी परिसरात राहते; परंतु पत्ता किंवा मोबाईल क्रमांक नाही, असे त्यांनी सांगितले.

त्यावर ‘सकाळ’ कार्यालयातून मुंढवा येथील बातमीदार कैलास गावडे यांना हा घडलेला प्रकार कळविण्यात आला. त्यांनी या महिलेचा पत्ता शोधण्यासाठी चंदननगर, खुळेवाडी परिसर पिंजून काढला. पोलिस ठाण्यात विचारणा केली. अखेर ही महिला मुंढवा पोलिस चौकीत दागिने चोरीची तक्रार देण्यासाठी आल्याचे पाहिले. त्यांनी या महिलेस तुमचे दागिने रिक्षाचालकाने ‘सकाळ’ कार्यालयात आणून दिल्याचे सांगितले. महिलेचे कुटुंबीय आणि रिक्षाचालक यांना कार्यालयात बोलावून घेतले. रिक्षाचालक जाधव यांनी त्या महिलेस ओळखले. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब सुर्वे यांच्या हस्ते महिलेस दागिने परत करण्यात आले. त्या वेळी सुवर्णा शेलार आणि कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दागिने परत मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
 

आयुष्यभर प्रामाणिकपणे व्यवसाय केला. त्यामुळे मुलगा इलेक्‍ट्रिक इंजिनिअर झाला. दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. दिवसभर कष्ट करून घरी गेल्यानंतर नातवाला पाहिले की सगळा थकवा विसरून जातो. ज्या व्यक्‍तीचे दागिने हरवले त्यांची काय अवस्था झाली असेल, याचा विचार केला आणि दागिने परत केले. 
- दत्तू विठ्ठल जाधव, रिक्षाचालक 

काका, तुम्ही आम्हाला देवासारखे भेटलात. मंगळसूत्र, दागिने तुम्ही आम्हाला परत आणून दिल्याबद्दल तुमचे आभार कसे मानावे, हेच समजत नाही. 
- सुवर्णा सचिन शेलार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com