My Newspaper Vendor : वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान; वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचा पुढाकार

चिंतामणी क्षीरसागर
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

गेल्या अनेक वर्षापासुन गावात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे महावीर माणिकचंद मेहता (वय ६४) यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

वडगाव निंबाळकर - भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा करण्यासाठी सकाळ वृत्तसमुहाने घेतलेल्या पुढाकाराला वृत्तपत्र विक्रेताचा सन्मान करत वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीने प्रतिसाद दिला.

गेल्या अनेक वर्षापासुन गावात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे महावीर माणिकचंद मेहता (वय ६४) यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच आकांक्ष शिंदे, माजी सरपंच सुनिल ढोले, सदस्य मनोजकुमार साळवे, शिवाजी लोणकर, अजित भोसले, राजेंद्र काकडे, ग्रामसेविका स्वाती ताकवले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय खोमणे उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच ढोले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मेहता यांचा सुमारे पन्नास वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय आहे. बालवयापासून ते मन लावून हे काम ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता प्रामाणिकपणे करीत आहेत. गावात वाचक वर्ग निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हाताच्या बोचावर मोजणारी लोक पुर्वी पेपर वाचत आता घरोघरी वृत्तपत्र येते वयाची साठी ओलांडली तरी काम चालुच आहे. विशेषतः दररोज सायकलचा सराव असल्याने कोणताही आजार जडला नाही. सकाळमध्ये आज वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्माणा बाबत वाचले आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्काराचे नियोजन केले. खोमणे यांनी मेहता यांच्या कठोर परिश्रमाची माहिती सांगुन आभार मानले. मेहता यांनी सांगितले की, '१९९६ साली मला सकाळ कडून सन्मान पत्र मिळाले होते. सकाळ समुह आम्हाला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मानते या उपक्रमामुळे ग्रामस्थांनी माझा सन्मान केला याबद्दल ग्रामस्थ व सकाळचे आभार.'

Web Title: Honor of newspaper vendor Wadgaon Nimbalkar Gram Panchayat Initiative