#MyNewspaperVendor वृत्तपत्र विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला. तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय करणारे, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही सायकलवरून घरोघरी पेपर टाकणारे व पेपरविक्री करून उच्चशिक्षणात अव्वल येणाऱ्या विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. 

पुणे - ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वर्षभर घरोघरी जाऊन पेपर टाकणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करून ‘सकाळ’ने प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला. तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय करणारे, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही सायकलवरून घरोघरी पेपर टाकणारे व पेपरविक्री करून उच्चशिक्षणात अव्वल येणाऱ्या विक्रेत्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. 

माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम आझाद यांचा १५ ऑक्‍टोबर हा जन्मदिवस. सकाळ व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने पुढाकार घेऊन हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा केला. तीन- चार पिढ्यांपासून गेली ६०- ७० वर्षे हा व्यवसाय करणाऱ्या ज्येष्ठ विक्रेत्यांना या वेळी सन्मानपत्र, शाल - श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. 

समाजात दुर्लक्षित राहिलेल्या; पण महत्त्वाचे काम करणाऱ्या या घटकाला प्रथमच कृतज्ञतापूर्वक सन्मान मिळाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता पिसे, सचिव अरुण निवंगुणे, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, वितरण विभागाचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे, मुख्य व्यवस्थापक अब्दुल अझीझ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

कौटुंबिक सोहळा 
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांपैकी सोनाली चोरगे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. सोनाली चोरगे आपले मनोगत व्यक्त करताना भावुक झाल्या होत्या, तो क्षण सर्वच उपस्थितांना गलबलून टाकणारा होता. सत्कारानंतर केक कापण्याचा छोटेखानी कार्यक्रम झाला. थरथरत चालणाऱ्या ज्येष्ठांपासून ते विक्रेत्यांच्या पाल्यांपर्यंत सर्वांनीच जणू एखादा कौटुंबिक सोहळा असावा, असा सहभाग घेतला होता.

ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते आणि पाल्यांचा ‘सकाळ’ने केलेल्या सत्कारामुळे पाठीवर कौतुकाची, प्रेमाची थाप मिळाली आहे. यातून भावी पिढीलाही या व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळेल. समाजातल्या दुर्लक्षित घटकाला या निमित्ताने प्रथमच प्रतिष्ठा मिळाल्याचे चित्र दिसले.
- विजय पारगे, अध्यक्ष,  पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ  

मागील ८०- ८५ वर्षांपासून आमच्या अनेक पिढ्या हा व्यवसाय करत आहेत. हा व्यवसाय करणे सोपे नाही, प्रसंगी ग्राहकांकडून अनेक प्रकारची बोलणी ऐकावी लागली, आज मात्र आमचा मान- सन्मान केल्यामुळे कष्टाचे चीज झाले असे वाटते. 
- पन्नालाल मुनोत,  ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते, नाना पेठ

आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ‘डे’ साजरे होतात, आमच्यासाठी मात्र असा कोणताही दिवस नव्हता. आज आमचे कौतुक झाल्यामुळे फार आनंद झाला. हा दिवस म्हणजे आम्हा वृत्तपत्र विक्रेत्यांचा वाढदिवसच आहे. दरवर्षी असा वाढदिवस साजरा व्हावा.
- महादेव मते,  ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते, सिंहगड रस्ता

गरिबीमुळे निरक्षर राहिलेला मी पोट भरण्यासाठी या व्यवसायात आलो. आज लोकांपर्यंत ज्ञानाचा खजिना पोचवण्याचं काम करतो, याचा आनंद वाटतो. ‘सकाळ’कडून आम्हा वृत्तपत्रविक्रेत्यांना नेहमीच सहकार्य मिळते.
- सदाशिव जंगम,  ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते, चिंचवड

Web Title: Honor to newspaper vendors in pune