पोलिस अधिकारी श्रीगणेश कानगुडेंचा गावगुंडांनी घेतला धसका

पोलिस अधिकारी श्रीगणेश कानगुडेंचा गावगुंडांनी घेतला धसका

वालचंदनगर : वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्या कार्यपद्धतीचा इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील गावपुढारी,गावगुंड व अवैध धंदेवाल्यांनी धसका घेतला असून सर्वसामान्य जनतेमधून कानगुडे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पुणे जिल्हाचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्हातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये कानगुडे यांचा समावेश आहे. कानगुडे यांच्याकडे वालचंदनगर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 'बोलणे कमी व काम जास्त’ ही त्यांनी कार्यपद्धती अवलंबली आहे. पोलिस ठाण्याचा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना शिस्त लावून वर्दीमध्ये राहण्याची सूचना दिली.

दोन गटांमध्ये अथवा दोन व्यक्तिंमध्ये भांडण झाल्यास ते मिटविण्यासाठी पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये मध्यस्थी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यांच्यावर कानगुडे यांनी कारवाईचा बडगा उभारला असून, काम असले तर पोलिस ठाण्याला या..., आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करु नका..., कायदासुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असे कुठलेही कृत्य करु नका., अशी तंबी दिल्यामुळे पोलिस ठाण्यालगत घिरट्या घालणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली अाहे.

वालचंदनगर परिसरामध्ये सायंकाळच्या वेळी हत्यार घेऊन फिरणाऱ्या युवकांची संख्या वाढत चालली होती. त्यांच्यावर ही पहिल्यांदाच कारवाईचा बडगा उभारला. तसेच रस्त्यावर, चौकामध्ये तलवारीने केक कापण्याचे प्रमाण वाढण्यास सुरवात झाली होती. त्यांना कारवाई करण्याची तंबी दिली आहे. अवैध,बेकायदेशीर दारु विक्री,जुगाराचा अड्डे चालविणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरु केला असून छापे मारण्यास सुरवात केली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वीच एका मोठ्या हॉटेलवर छापा मारुन बेकायदेशीर दारु विक्रीला लगाम लावला आहे. अवैध धंदेवाल्यांनी कानगुडे यांच्या कार्यपद्धतीचा धसका घेतला आहे. तसेच गावोगावी व्यापारी, नागरिकांच्या बैठका घेऊन चोरीच्या घटना रोखण्यासाठी,गावामध्ये शांतता राहण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. कानगुडे यांच्या कार्यपद्धतीवर सर्वसामान्य जनता खुश असून, त्यांचे कौतुक होत आहे. 

वॉरंट असणाऱ्यांची धरपकड...

चेक बाउन्स व इतर प्रकरणामध्ये न्यायालायाचे वाॅरंट असलेले आरोपी न्यायालयामध्ये हजर न राहता भरचौकामध्ये फिरत होते. त्यांच्या विरोधात ही कारवाईचा बडगा उभारला असून, वॉरंट असलेल्या नागरिकांना तातडीने अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचा सपाटा लावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com