रिक्षात वडापाव खाताना काळाचा घाला

मंगळवार पेठ - होर्डिंग कोसळल्यानंतर रिक्षांचे झालेले नुकसान.
मंगळवार पेठ - होर्डिंग कोसळल्यानंतर रिक्षांचे झालेले नुकसान.

‘‘लक्ष्मी रस्ता येथे जाण्यासाठी एका प्रवाशाने ताडीवाला रस्ता येथून रिक्षा पकडली. नागपूर चाळ येथील रिक्षाचालक भटू कुंभार हे रिक्षा चालवत होते. प्रवाशाने सोहरब हॉलजवळ गेल्यानंतर वडापाव घेण्यासाठी रिक्षा थांबवली. त्यानंतर ‘चला, रिक्षा लवकर घ्या,’ असे चालकास सांगितले. ते शाहीर अमर शेख चौकाजवळ आले. सिग्नल सुरू असल्यामुळे ते काही वाहनांच्या मागे थांबले होते. परंतु त्या प्रवाशाने ‘घ्या ना पुढे गाडी,’ असे म्हणत रिक्षा पुढे घेण्यास सांगितली. 

‘पॅसेंजर घाई करीत असल्यामुळे रिक्षा पुढे घेतली आणि तेवढ्यात होर्डिंगचा सांगाडा रिक्षावर आदळला. तो प्रवासी रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता. रिक्षाची पुढील काचही फुटली. हे बघून मला भोवळ आली. पोलिसांनी मला बाजूला घेऊन पाणी पिण्यास दिले. केवळ देवाची कृपा म्हणूनच मी वाचलो,’’ असे रिक्षाचालक कुंभार सांगत होते.

जखमींमध्ये सात जण रिक्षाचालक...
शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून चार रिक्षा, दोन दुचाकी व एक चारचाकीचे नुकसान झाले. त्यामध्ये एकूण पंधरा जण जखमी झाले. त्यामध्ये सात जण रिक्षाचालक होते. त्यामुळे आजचा दिवस रिक्षाचालकांसाठी काळा दिवस होता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

परमीट मिळाले पण डोके फुटले
रिक्षाचालक कैलास गणपत गायकवाड हे खांबवडी (ता. वेल्हे) येथील रहिवासी. नवीन रिक्षा घेतल्यामुळे ते त्यांचे नातेवाईक अनिल पिसे यांच्यासह रिक्षाचे परमीट घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात आले होते. परमीट मिळाल्याच्या आनंदात ते गावी परतत होते. त्या वेळी अचानक होर्डिंग कोसळल्यामुळे डोक्‍याला मार लागला. परंतु उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. 

अर्ध्या तासात मदतकार्य
दुर्घटनेनंतर अर्ध्या तासाच्या आत पोलिस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू झाले. दुपारी दोनच्या सुमारास जखमींना रुग्णालयाकडे रवाना केल्यानंतर गॅसकटरच्या साहाय्याने सांगाडा कापून तो काढण्यात आला. या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

नमाज ठरली अखेरची 
जुन्या बाजारातील मशिदीमध्ये शुक्रवारी दुपारी नमाज पठण करणे, हा जावेद खान यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. आजही ते नमाज पठणासाठी जुन्या बाजारात आले होते; पण आजची नमाज ही त्यांची अखेरची ठरली... हे सांगत असताना त्यांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. जमलेले नातेवाईक एकमेकांना आधार देत होते, पण प्रत्येक जणांना जावेदभाईच्या अकस्मात जाण्याने अक्षरशः हादरल्याचे स्पष्ट जाणवत होते.जावेद शेख लक्ष्मी रस्त्यावरील मेन्स ॲव्हेन्यूमध्ये मास्टर म्हणून काम करत होते. शुक्रवारी दुपारी जावेद खान न चुकता जुन्या बाजारातील मशिदीमध्ये जात असत. गेल्या दहा वर्षांपासूनचा त्यांचा हा नित्यक्रम होता. आजही ते मशिदीत गेले; पण परत ते कामाच्या ठिकाणी परतले नाहीत. हे सांगताना नातेवाइकांना हुंदके आवरत नव्हते.

गाडी घेऊन आठवडाही झाला नाही...
घोरपडीगाव येथील ओला कॅबचालक किरण राजाराम जाधव यांना आरटीओ चौकात ऑनलाइन बुकिंग मिळाले. प्रवाशांना घेऊन मालधक्‍का चौक मार्गे वडगावशेरी येथे जात होतो. गाडीत दोन प्रवासी होते. चौकात होर्डिंग गाडीच्या मागच्या काचेवर पडले. त्यामुळे काच फुटली. पण मी आणि प्रवाशांपैकी कोणालाही जखम झाली नाही. ओला कंपनीकडून भाडेतत्त्वावर गाडी घेतली आहे. त्याला अजून एक आठवडाही पूर्ण झालेला नाही. तोवर ही घटना घडली.

केवळ नशिबानेच वाचलो
कोंढवा बुद्रुक येथील रामचंद्र बोगनळी म्हणाले, ‘‘आरटीओ कार्यालयात लायसन नूतनीकरण करून घरी जेवण्यासाठी जात होतो. चौकात सिग्नलला थांबल्यानंतर होर्डिंग पडल्यामुळे क्षणभर काहीच सुधरले नाही. गुडघ्याला मार लागला होता. गाडी बंद करून रस्ता ओलांडून बाजूला जाऊन बसलो. नशिबाने, देवाच्या कृपेनेच वाचलो.’’ 

सांगाडा काढण्याबाबत तीन स्मरणपत्रे 
मंगळवार पेठेतील दुर्घटनाग्रस्त होर्डिंगचा सांगाडा नेमका कोणाच्या हद्दीत आहे, यावरून दुपारी महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामध्ये वाद झाला. यासंदर्भात दोन्ही आस्थापनांच्या अधिकाऱ्यांनी, ‘माहिती घेऊन त्यावर बोलू’, अशी उत्तरे दिली. दरम्यान, महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये होर्डिंगचा सांगाडा काढण्यासंदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाला तीन स्मरणपत्रे देण्यात आली असल्याचे सांगितले; परंतु त्यासंदर्भात संबंधित ठेकेदार आणि रेल्वे प्रशासनामध्ये कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. न्यायालयाने ठेकेदाराच्या बाजूने निकाल दिला. हा सांगाडा ठेकेदाराला न देता रेल्वे प्रशासनाच्या जागेत हा असल्यामुळे त्याचे भंगार ठेकेदाराने नेऊ नये; म्हणून गुरुवारी रात्रीपासून तो पायथ्यापासून कापण्यास सुरवात केली होती. अखेर तो सांगाडा शुक्रवारी कोसळला.

प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रिया 
दुपारी पावणेदोनच्या सुमारास सिग्नलला गाड्या उभ्या होत्या. अचानक रस्त्याच्या कडेला असलेला होर्डिंगचा सांगाडा गाड्यांवर आदळला. त्याठिकाणी गॅसकटरच्या साह्याने होर्डिंग खालच्या बाजूने कापण्यात येत होते. अचानक होर्डिंगचा भाग कोसळला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, रेल्वे पोलिस आणि कापण्याचे काम करत असलेले दहा ते बारा कर्मचारी सिलिंडर टाकून पळून गेले. आम्ही जखमींना वाचविण्यासाठी रस्त्यावर धावून गेलो.’’
- नरेंद्र अशोक जगताप, स्थानिक रहिवासी, प्रत्यक्षदर्शी

रस्त्यावरील दृश्‍य अत्यंत भयानक होते. पाच ते सहा रिक्षांचा चक्काचूर झाला. त्यामध्ये १२ ते १४ लोक जखमी झाले. त्यामध्ये ४ वर्षांचा एक लहान मुलगादेखील होता. होर्डिंगचा सांगाडा कापण्याचे काम काल रात्रीपासून सुरू होते.’’
- स्वप्नील आटपाळकर, स्थानिक रहिवासी, प्रत्यक्षदर्शी

पाच ते सहा रिक्षा, दोन दुचाक्‍यांचे नुकसान झाले. जखमींना ससूनला नेण्यात येत होते. बहुतांश लोकांच्या डोक्‍याला जबर मार लागला होता.’’
- लक्ष्मी कांबळे, जुना बाजारातील रहिवासी

दुपारची नमाज झाल्यानंतर आम्ही मशिदीबाहेर येत होतो. त्या वेळी लोक सैरावैरा पळत होते. मी माझ्या मित्रांसोबत मशिदीच्या आत गेलो.’’
- अस्लम शेख, शाळकरी मुलगा

‘‘सिग्नल लागल्यामुळे मी हातगाडी घेऊन मंगळवार पेठेच्या कमानीशेजारी उभा होतो. त्या वेळी समोरच्या बाजूने रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी सांगाडा कोसळला. मी माझी हातगाडी रस्त्याच्या बाजूला लावून, त्याठिकाणी मदतीसाठी गेलो. दहा ते पंधरा लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यामध्ये एक लहान मुलगा आणि मुलगीदेखील होती. आम्ही सर्वांना ससूनकडे पाठविले.
- सुधाकर गायकवाड, स्थानिक फेरीवाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com