इथे कोसळला मृत्यू

मंगळवार पेठ, शाहिर अमर शेख चौक - जाहिरात लावण्यासाठी उभारलेला अंदाजे सत्तर फूट उंचीचा लोखंडी सांगाडा वाहतूक सिग्नलजवळील वाहनांवर कोसळून शुक्रवारी चार जणांचा मृत्यू झाला.
मंगळवार पेठ, शाहिर अमर शेख चौक - जाहिरात लावण्यासाठी उभारलेला अंदाजे सत्तर फूट उंचीचा लोखंडी सांगाडा वाहतूक सिग्नलजवळील वाहनांवर कोसळून शुक्रवारी चार जणांचा मृत्यू झाला.

होर्डिंग कोसळून पुण्यात चौघांचा मृत्यू
पुणे - वेळ दुपारी सुमारे पावणेदोनची ... जुन्या बाजाराजवळील अत्यंत गजबजलेल्या चौकातील (शाहीर अमर शेख चौक) सिग्नलला नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी ... एवढ्यात कडाडकड असा प्रचंड आवाज ऐकू आला... काय झालं हे कळायच्या आत सिग्नलला थांबलेल्या चौघांना मृत्यूने गाठले ... एकच हलकल्लोळ झाला ... हे सगळे घडले ते केवळ पाच सेकंदांत. सिग्नलच्या जवळ असलेले होर्डिंग कोसळले होते... पायापासून ते कापण्याचा प्रताप केल्याने अपघात झाला होता.

सिग्नलला थांबल्यानंतर अशा प्रकारचा अपघात होऊ शकतो, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. अपघातानंतरचे दृश्‍य अत्यंत भयानक होते. दहा ते 15 जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. किमान 5-6 रिक्षांचा चक्काचूर झाला, अनेक दुचाकींचेही नुकसान झाले. काही जणांनी तर मृत्यू अक्षरशः फूटभर अंतरावरून पाहिला होता. ज्या होर्डिंगचा सांगाडा कोसळला, त्याचा आकार 40 फूट बाय 40 फूट होता.

रेल्वेच्या हद्दीत असलेला तो सांगाडा काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व कामगारांसह रेल्वे पोलिस कर्मचारी तैनात होते. सांगाड्याला आधार म्हणून सीमाभिंतीच्या आतील झाडांना फक्त मोठे दोरखंड बांधले होते. त्या वेळी रस्त्यावरील वाहतूकही सुरू होती. सांगाडा काढण्यासाठी कोणत्याही क्रेनची मदत घेतली नव्हती. या चौकात वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. सांगाडा रस्त्यावर पडू शकतो, हे संबंधित ठेकेदाराच्या लक्षात कसे आले नाही ? असाही प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे. सांगाडा खालच्या बाजूने कापल्यामुळे दोन्ही बाजूला कोसळला. झाडे मुळासकट उपटली गेली. दुर्घटनेनंतर भिंतीपलीकडील सर्व लोक पळून गेले. रस्त्यावर असलेल्या लोकांना मात्र हकनाक जीव गमवावा लागला.

होर्डिंगच्या मुद्‌द्‌यावरून रेल्वे प्रशासन व पुणे महापालिका यांच्यात वाद होता. होर्डिंगचा हा सांगाडा काढण्यासाठी पालिकेने मध्य रेल्वेला स्मरणपत्रेही दिली होती. "भंगार' जमा करण्यासाठी गुरुवारी (ता. 5) रात्रीपासून तो सांगाडा पायापासून कापण्यास सुरवात केली होती. अखेर तो सांगाडा आज कोसळला.

आरटीओ कार्यालयाकडून जुन्या बाजाराकडे येणाऱ्या रस्त्यावरील चौकात लाल सिग्नल सुरू होता. त्यामुळे वाहनचालक थांबले होते. त्या वेळी चौकातील रस्त्यालगत रेल्वेच्या जागेतील होर्डिंग अचानक तुटून रिक्षा, दुचाकी आणि मोटारीवर आदळले. त्यात दोघांचा जागीच, तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत चार रिक्षांसह दोन दुचाकी आणि मोटारीचे नुकसान झाले आहे. भीमराव गंगाधर कासार (वय 70, रा. पिंपळे गुरव), श्‍यामराव धोत्रे (वय 48, रा. एमडी कॅम्प, देहूरोड), शिवाजी देविदास परदेशी (वय 40, रा. नाना पेठ), जावेद मिसबाऊद्दीन खान (वय 49, रा. पिंपरी) अशी मृतांची नावे आहेत. मृतांच्या नातेवाइकांना रेल्वे प्रशासनाने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.

बंडगार्डन पोलिसांनी रेल्वे अधिकारी, होर्डिंग काढणारे कामगार आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आईपाठोपाठ वडिलांचा आधार गमावला
रिक्षाचालक शिवाजी परदेशी यांच्या पत्नी प्रीती यांचे केईएम रुग्णालयात काल निधन झाले होते. त्यांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी परदेशी कुटुंबीय आळंदी येथे गेले होते. तेथून शिवाजी आणि कुटुंबीय घरी परतत होते; परंतु रस्त्यात शिवाजी यांच्यावर काळाने घाला घातला. परदेशी यांना समृद्धी आणि समर्थ ही दोन मुले आहेत. त्यांना दोन दिवसांत आईपाठोपाठ वडीलही गमवावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com