कारभारी बदलले ‘कारभार’ तोच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांनी शहरात मिळेल त्या ठिकाणी फ्लेक्‍स लावून शहर विद्रूप करण्याचा सपाटा लावला आहे. भरीस भर म्हणून काही राजकीय पक्षांनीही शहराध्यक्षांच्या नावाने ‘धन्यवाद पुणेकरांनो’ असे फ्लेक्‍स चौकाचौकांत लावून त्यात भर घातली आहे. काही ठिकाणी तर पराभूत उमेदवारही मतदारांचे आभार मानण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे विद्रूप करीत आहेत. मात्र, या प्रकाराकडे महापालिका प्रशासन काणाडोळा करीत आहे. भाजपच्या शहराध्यक्षांनी ‘कार्यकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल,’ असे सांगत कारवाईबाबत कानावर हात ठेवले आहेत.

निष्ठांचे प्रदर्शन
महापालिका निवडणुकीची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी झाली. त्यात निवडून आलेल्या उमेदवारांनी शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बसथांबे, वाहतूक नियंत्रक दिवे, उद्याने, शासकीय इमारतींच्या भिंती आदी दिसेल त्या ठिकाणी फ्लेक्‍स लावले आहेत. त्यावर स्वतःची, पत्नीची छबी झळकवतानाच कोणत्या नेत्यांना आपल्या निष्ठा वाहिल्या आहेत, याचेही प्रदर्शन घडविले आहे. 

सगळीकडेच ‘आक्रमण’
उपनगरांतही मोठ्या प्रमाणावर फ्लेक्‍स लावले गेले आहेत. प्रमुख रस्तेही त्यांच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत. महापालिकेत बदल घडवून आणण्याची भाषा आणि भाषणे करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांचा त्यात प्रामुख्याने भरणा आहे. शहराच्या कोणत्याही भागात गेले तरी फ्लेक्‍सबाजीला आलेले उधाण नजरेस पडते. काही मोजक्‍या जणांनी मात्र अधिकृत फलकच भाडेतत्त्वावर घेण्याची दक्षता बाळगल्याचेही दिसून येते.

तीच मानसिकता कायम
काही फ्लेक्‍सवरील छायाचित्रांमध्ये पंतप्रधानांनाही सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी बदलले तरी मानसिकता मात्र प्रसिद्धीच्या हव्यासाचीच असल्याचे ओंगळवाणे प्रदर्शन पुणेकरांसमोर सध्या होत आहे. 

मतमोजणी झाल्यावर सलग तीन दिवस सुट्या होत्या. फ्लेक्‍सवर कारवाई करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. त्यानुसार कालपासून कारवाई सुरू झाली आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयांशी पुन्हा संपर्क साधून फ्लेक्‍स काढण्यास सांगितले जाईल. वेळप्रसंगी याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाईही करण्यात येईल. 
- विजय दहिभाते,  उपायुक्त, परवाना विभाग

फ्लेक्‍सबाजीला लगेचच आळा घालता येईल, असे वाटत नाही. प्रचलित राजकीय व्यवस्थेत लोकांपर्यंत पोचण्याचा फ्लेक्‍स हा एक पर्याय आहे. त्यामुळे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांची मानसिकता घडवावी लागेल. भविष्यात याबाबत नक्कीच उत्तर शोधण्यात येईल. 
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भाजप

Web Title: hording in pune city