बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

टाकळी हाजी - आमदाबाद (ता. शिरूर) येथे बिबट्याने हल्ला केल्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार झाला. दररोज बिबट्याचे वाढते हल्ले यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. मेंढपाळ बुवाजी उद्धव शिंदे (रा. मलठण, ता. शिरूर) हे मेंढ्या चारण्यासाठी आमदाबाद (ता. शिरूर) येथे गेले होते. जाधव वस्तीजवळ वस्ती करून ते राघू जाधव यांच्या शेतात राहत होते. रविवार (ता. 12) रात्री बाराच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या कळपावर हल्ला केला. या वेळी बिबट्याने अडीच वर्षांचा घोडा जागीच ठार केला. आरडाओरडा केल्यावर बिबट्याने तेथून धूम ठोकली. शनिवार (ता. 11) भीमा साधू बारकडे यांचाही घोडा बिबट्याने ठार केल्याचे या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, या भागात वन विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी सरपंच योगेश थोरात यांनी केली आहे.
Web Title: Horse death in leopard attack