रुग्णालय ‘लाल फितीत’
पिंपरी - चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी चाकणमधील टप्पा दोनमध्ये जागा राखीव झाली आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव पुढे सरकत नसल्यामुळे रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे.
पिंपरी - चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठी चाकणमधील टप्पा दोनमध्ये जागा राखीव झाली आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव पुढे सरकत नसल्यामुळे रुग्णालयाच्या उभारणीला विलंब होत आहे.
पूर्वी पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यांत कारखान्यांची संख्या मोठी होती. कालांतराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) शहरालगतच्या चाकण, तळेगाव पट्ट्यांत औद्योगिक वसाहत विकसित केली. त्यानंतर अनेक देश-विदेशी कंपन्यांनी या भागात उत्पादन प्रकल्प सुरू केले. स्वाभाविकच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. सध्या येथील दोन लाखांहून अधिक कामगार कामगार राज्य विमा मंडळाचे विमाधारक आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी याठिकाणी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंडळाने चाकण परिसरात शंभर खाटांचे रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवला होता. तिथून तो दिल्लीतील मुख्यालयाकडे पाठवला गेला. सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारकडे आहे.
सरकारकडून अद्याप मान्यता नाही
रुग्णालय उभारणीच्या प्रस्तावानंतर एमआयडीसीने चाकण टप्पा दोनमध्ये २२ हजार ४८३ चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड आरक्षित करून ठेवला असून, या संदर्भातील पत्र कामगार राज्य विमा मंडळाच्या कार्यालयाकडे पाठवले आहे. त्यामध्ये प्रस्तावित रुग्णालयाचा आराखडा सादर करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. मात्र, सरकारकडून हा प्रस्ताव अद्याप मान्य न झाल्यामुळे हे काम अडकून पडले आहे. रुग्णालयाला मान्यता मिळाल्यानंतर त्याठिकाणी आवश्यक असणारे डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ राज्य सरकारने उपलब्ध करून द्यायचा आहे.
मार्चमध्ये सुरू होणार डिस्पेन्सरी
विमाधारक कामगारांना प्राथमिक उपचाराची सुविधा मिळावी, म्हणून कामगार राज्य विमा मंडळाने चाकणमध्ये तीन हजार चौरस फूट जागेमध्ये डिस्पेन्सरी आणि शाखा कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात याची सुरवात होणार आहे. कामगारांना याठिकाणी प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याखेरीज बाहेरच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे क्लेम इथे घेतले जाणार आहेत. कामगारांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, म्हणून मंडळाने तळेगाव आणि चाकण परिसरातील ११ खासगी रुग्णालयांशी करार केला आहे.
या प्रस्तावित रुग्णालयाच्या उभारणीसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. या रुग्णालयामुळे येथील कामगारांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल.
- आर. गुणशेखरन, अतिरिक्त आयुक्त, कामगार राज्य विमा महामंडळ