#PMCHealth रुग्णालये ‘ऑक्‍सिजन’वर

योगिराज प्रभुणे
बुधवार, 13 जून 2018

पुणे - महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाअभावी परवाना नूतनीकरण प्रक्रियेचा वेग मंदावल्याने शहरातील २३९ रुग्णालये ‘ऑक्‍सिजन’वर आहेत. त्याचा थेट परिणाम या रुग्णालयांमधून उपचार घेणाऱ्या साडेतीन हजार रुग्णांवर होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. 

‘बाँम्बे नर्सिंग ॲक्‍ट’ अंतर्गत शहरातील प्रत्येक रुग्णालयाची नोंद महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे. दरवर्षी तीन वर्षांसाठी हा परवाना महापालिका देते. त्याची मुदत संपल्यानंतर परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान ही प्रक्रिया होते.

मनुष्यबळाअभावी उशीर
रुग्णालयाच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी ‘बाँम्बे नर्सिंग ॲक्‍ट’मधील तरतुदीची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे आलेली प्रत्येक फाइल तपासून, त्यातील कागदपत्रांची सत्यता पडताळून परवान्याचे नूतनीकरण करण्यात येते. वॉर्ड स्तरावर या फाइल संकलित करून, त्यावर पुढे प्रक्रिया करण्यासाठी दोनच अधिकारी आहेत. या कामासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. या मनुष्यबळात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आल्याचेही विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

परवाना नूतनीकरण न होण्याची कारणे
 रुग्णालयातील ‘व्हिजिटिंग डॉक्‍टर’ची माहिती न देणे
 व्यावसायिक दराने पाणीपट्टी न भरणे
 व्यावसायिक दराने मालमत्ता कर न भरणे
 महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र नसणे
 महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडे नोंदणीकृत परिचारिका नसणे
 अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसणे

डॉक्टर हवालदिल
तीन-चार महिन्यांनंतरही रुग्णालयाच्या परवान्याचे नूतनीकरण झाले नसल्याने शहरातील रुग्णालयाची मालकी असलेले डॉक्‍टर हवालदिल झाले आहेत. ही सर्व रुग्णालये १० ते ३३-३५ खाटांची आहेत. अर्ज करूनही परवाना नूतनीकरण न झालेली २३९ रुग्णालये आहेत. या छोट्या रुग्णालयांमधे सुमारे साडेतीन हजार खाटा आहेत. 

महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही रुग्णालयाची परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया वेगाने होत नाही. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. तसेच, नोंदणी नसलेल्या रुग्णालयांमधून उपचार घेतल्यास वैद्यकीय विमा कंपन्यांकडून ‘क्‍लेम सेटल’ होत नाही. त्याचा आर्थिक फटका रुग्णांना बसतो.
- डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, आयएमए पुणे हॉस्पिटल बोर्ड

कायद्याने सांगितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ८६ रुग्णालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहेत. वॉर्डस्तरावरून आलेली ३२५ पैकी १५४ प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच, ८५ प्रकरणांमध्ये रुग्णालयांमधील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यांना त्यात सुधारणा करण्याची संधी दिली आहे.
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका. 

Web Title: hospital issue health patient treatment man power