पुण्यात प्रसूतीसाठी मिळेनात रुग्णालय

पुण्यात प्रसूतीसाठी मिळेनात रुग्णालय

पुणे - पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात प्रसूतीसाठी चार-चार रुग्णालयांचे दरवाजे ठोठवावे लागतात, याचा विदारक अनुभव मंगळवारी सायंकाळी गर्भवतीने घेतला. प्रसूतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत गर्भवतीच्या आई-वडिलांचा प्राण अक्षरशः कंठाशी आलेला; पण संवेदना बोथट झालेल्या आरोग्य यंत्रणेवर या कशाचा परिणाम होत नव्हता. अखेर ससून रुग्णालयात सुरक्षित प्रसूती झाली आणि आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पौडमधील एका रुग्णालयात प्रसूतीसाठी नावनोंदणी केलेली. गर्भवतीचे दिवस भरत आले होते. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी प्रसूतीपूर्वी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. कोरोनाची रॅपिड टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजल्यापासून त्या गर्भवतीची, तिच्या आई-वडिलांची धावाधाव सुरू झाली. ती रात्री साडेबारा वाजेपर्यंत सुरू होती. आठ तास जिवाच्या आकांताने एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात अक्षरशः पळत होते. 

गर्भवतीचे वडील बाबू चव्हाण म्हणाले की, कोरोनाची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने पौडच्या रुग्णालयात घेतले नाही. त्यांनी पुण्यातील नवले रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. आम्ही पौडवरून मंगळवारी सायंकाळपर्यंत नवले रुग्णालयात पोचलो; पण पुढच्या तीन-चार दिवसांत रुग्णालयातील कोविड विभाग बंद करणार आहे. त्यामुळे गर्भवतीची प्रसूती करता येणार नाही, असे सांगितले. तेथून गर्भवतीला महापालिकेच्या सोनवणे रुग्णालयात हलवले. तेथे गर्भवतीची तपासणी केली; पण तिचा रक्तदाब वाढल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी अत्यावश्‍यक व्यवस्था रुग्णालयात नाही. त्यामुळे सोनवणे रुग्णालयातून ससून रुग्णालयाचा रस्ता दाखवला. अर्थात, त्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली. सोबत एक डॉक्‍टरही आले. ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही मिनिटांमध्येच प्रसूती झाली. त्या वेळी आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. 

पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यामध्ये प्रसूतीसाठी चार रुग्णालयांमध्ये फिरल्याचे आश्‍चर्य ससून रुग्णालयातील डॉक्‍टरांनी व्यक्त केले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com