#HospitalIssue रुग्णालयाचे वाहनतळ केवळ कागदावरच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

येरवडा - विश्रांतवाडी येथील टॅंक रस्त्यालगतच्या खासगी रुग्णालयाच्या रचनेत बदल करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित रुग्णालयाने पालिकेची परवानगी घेतली; मात्र बांधकाम रचना आणि नकाशाचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयाचे स्वतःचे वाहनतळही नसतानाही ते नकाशात दाखविण्यात आले आहे. रुग्णवाहिकेसाठी रस्तासुद्धा नाही. नगरसेवक आणि एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संगनमताने या रुग्णालयाच्या फेरफार नकाशाला मंजुरी दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

विश्रांतवाडी येथील खासगी रुग्णालयाला जाण्यासाठी रस्ता ना महापालिकेचा आहे ना खासगी. खडकी येथील सैन्य दलाच्या कारखान्यात तयार होणारे रणगाडे दिघी येथे चाचणीसाठी जातात, त्यासाठी सैन्य दलाने खडकी ते दिघीपर्यंत खास रणगाड्यांसाठी घडीव दगडांचा रस्ता तयार केला आहे. 

या रस्त्याला लागून असलेल्या या रुग्णालयाला नुकतीच महापालिकेने परवानगी दिली आहे. रुग्णालयाच्या मान्य नकाशात वाहनतळ दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात नाही. काही वर्षांपूर्वी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग चौथ्या मजल्यावर होता. तो आता तळमजल्यावर दाखविण्यात आला आहे. मोटारी व दुचाकींसाठी वाहनतळ पदपथावर दाखविण्यात आले आहे.

त्या रुग्णालयाचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने असल्यास कारवाई केली जाईल; मात्र येथील भाजी मंडई बेकायदा असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न लवकरच सुटेल.
- श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका

महापालिकेने परवानगी दिलेली असल्याने विश्रांतवाडी चौकातील रुग्णालयावर कारवाई केल्यास इतर रुग्णालयांवरसुद्धा कारवाई करावी लागेल.
- राजेश खाडे, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका

आळंदी रस्त्यावरील मुख्य चौकात रुग्णालय आहे. एखादा अपघात झाल्यास रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णाचे मोठ्या रुग्णालयात स्थलांतर करायचे झाल्यास अवघड आहे, त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका पोचू शकतो.
- नीलेश जाधव, रहिवासी

सर्व नियमांना धरूनच विनोद मेमोरिअल रुग्णालयाची रचना केली आहे. काही जण विनाकारण रुग्णालयाबाबत वावड्या उठवत आहेत.
- डॉ. मिलिंद येवलेकर, विनोद मेमोरिअल रुग्णालय, विश्रांतवाडी 

याबाबत आपली मते, प्रतिक्रिया कळवा.
ई-मेल करा webeditor@esakal.com वर 

Web Title: #HospitalIssue Hospital parking issue pune