कचरा शुल्कास हॉटेल व्यावसायिक तयार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

कचरा संकलनासाठी शुल्क आकारण्यास राज्य सरकारने सांगितले असल्याचे महापालिकेचे पदाधिकारी सांगतात. मात्र, घटनेच्या ७३ आणि ७४ व्या दुरुस्तीनुसार राज्य सरकारने अशी शुल्क आकारणी करण्यास सांगितलेले असेल, तरी ते नाकारण्याचे अधिकारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला आहे. असे असताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सभेच्या अधिकारांवर गदा आणत परस्पर शुल्क वसुली सुरू केली आहे, हे चुकीचे आहे. 
- मारुती भापकर, सामाजिक कायकर्ते, चिंचवड

पिंपरी - महापालिकेच्या वतीने ओला आणि सुका कचरा संकलन करण्याचा खर्च म्हणून घरगुतीसाठी ६०, दुकाने ९०, शोरूम, हॉटेल, उपाहारगृह १६०, लॉज, रुग्णालये २००, सरकारी, निमसरकारी कार्यालये १२० रुपये वसूल करण्यास जुलैपासून सुरवात केली आहे. या शुल्कास हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांनी तयारी दर्शविली आहे. मात्र, सामाजिक कायकर्ते, संघटनांनी यास तीव्र विरोध केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर शहरातील संबंधित व्यावसायिक, सामाजिक कायकर्ते यांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया. 
पद्‌मनाभ शेट्टी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशन -महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ओला आणि सुका कचऱ्याची विल्हेवाट तुमची तुम्हीच लावा, असे सांगितले होते. त्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन असे करणे व्यावसायिकांना शक्‍य नसल्याचे सांगितले. त्यांनीही ही जबाबदारी महापालिकेची असल्याचे मान्य केले.

ओला आणि सुका कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत पालिकेच्या वतीने १५ दिवसांपूर्वीच नोटीस दिली होती. कचरा संकलनासाठी महापालिकेच्या वतीने अगोदरच ‘अ’ दर्जाच्या हॉटेलकडून प्रतिवर्षी चार हजार रुपये तर ‘ब’ दर्जाच्या हॉटेलकडून तीन हजार रुपये शुल्क घेण्यात येते. मात्र, नव्याने घेण्यात येणाऱ्या १६० रुपये शुल्काबाबत महापालिकेने कळविलेले नाही.

अनिल गादिया, केटरिंग व्यावसायिक, चिंचवड : महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केटरिंग व्यावसायिकांना कचरा संकलनासाठी हिरव्या रंगाची प्लॅस्टिकचे भांडे घेण्यास सांगितले आहे. मात्र, तसे भांडे सध्या तरी बाजारात उपलब्ध नाही. ते उपलब्ध होताच आम्ही घेऊ. कचरा संकलनासाठी महापालिका जे शुल्क आकारेल ते देण्यास आम्ही तयार आहोत. 

मानव कांबळे, अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती : महापालिका मिळकतकरात अगोदरच विविध कर घेते. त्यामध्ये मलनिस्सारण व स्वच्छता कर आहे. मूलभूत सुविधा देण्यात महापालिकेला अगोदरच अपयश आले आहे. त्यामुळे पुन्हा नवीन करआकारणी करणे चुकीचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotel Businessman Ready for Garbage Fee